बॉक्स ऑफिसवर तारासिंगचा हातोडा; ‘गदर-2’ पोहोचला 500 कोटी क्लबमध्ये

अभिनेता सनी देओल याच्या ‘गदर-2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. अवघ्या 24 दिवसांत ‘गदर-2’ने 500 कोटी रुपयांची घसघशीत कमाई करत प्रभासच्या ‘बाहुबली 2’ आणि शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. गदरच्या तुफान यशानंतर तब्बल 22 वर्षांनी ‘गदर-2’ हा चित्रपट भेटीला आला आहे. तारासिंग आणि सकिना यांची अनोखी प्रेमकथा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांची केमिस्ट्री, दमदार ऍक्शन आणि ‘हमारा हिंदुस्थान झिंदाबाद था, झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा’, असे सिनेमातील संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच गदर 2 पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या थिएटरबाहेर रांगा लागत आहेत. शनिवारपर्यंत या चित्रपटाने 493 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. रविवारी हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला.