स्पोर्ट बाईकवरून मोबाईल हिसकावणारी टोळी गजाआड, आठ तासात केली कारवाई

जालना शहरात स्पोर्ट बाईकवरून येऊन मोबाईल हिसकवून जबरी चोरी करणारी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या आठ तासात गजाआड केले आहे. आरोपीच्या ताब्यातून जबरी चोरी करण्यासाठी वापरलेले वाहन व जबरी चोरीतील मुद्देमालासह दोन अँन्ड्राईड मोबाईल असा एकूण 1 लाख 5000 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज 2 जुलै रोजी करण्यात आली

दरम्यान 1 जुलै रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात संतोष मुक्ताराम बोबडे यांनी तक्रार दिली की, जुना मोंढा भागातील परिवार शॉपीच्या पाठीमागील रोडवरून जात असतांना पांढऱ्या रंगाच्या स्पोर्ट बाईकवरील तिन अनोळखी इसमांनी बळजबरीने त्यांच्या खिशातील मोबाईल हिसकावून घेतले. याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांच्यासह भेट देवून नमुद गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या.

त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण करून जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराची माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पोलीस ठाणे सदर बाजार जालना भागात झालेली जबरी चोरी ही विजय अनिल थोरात रा. सुंदरनगर जालना याने त्याच्या साथीदारासह केली आहे. मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचा शोध घेतला असता तो 1 जुलै 2023 रोजी सुंदर नगर, चंदनझिरा परिसरात त्याच्या होंडा कंपनीच्या हॉरनेट स्पोर्ट बाइकसह ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विजय उर्फ सोनू अनिल थोरात (22) रा. सुंदरनगर, चंदनझिरा जालना असे सांगितले. तसेच सदर गुन्हा आर्थिक फायद्यासाठी साथीदार विशाल शिवाजी मिश्रा (21) रा. सुंदरनगर जालना, राजु देविदास ढेंबरे वय 25 रा. मारोती मंदिराजवळ सुंदरनगर जालना यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अमलदार यांनी ताब्यात घेतले. आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातून गुन्हा करतांना वापरलेली होंडा कंपनीची हॉरनेट मोटारसायकल व गुन्ह्यात जबरीने हिस्कावुन चोरी केलेला एक पांढऱ्या सॅमसंग कंपनीचा ए 30 अॅन्ड्राईड मोबाईल जप्त केला आहे.

तसेच सदर आरोपींनी ईतर ठिकाणी गुन्हे केले आहेत काय याबाबत त्यांना कसोशीने विचारपुस केली असता आरोपींनी नावे विजय उर्फ सोनू अनिल थोरात व विशाल शिवाजी मिश्रा यांनी 1 जुलै रोजी दोघांनी रात्री 20.30. वाजेच्या सुमारास औद्योगिक वसाहत मधील ओम साईराम कंपनी समोरून एकटा पायी जाणाऱ्या एका व्यक्तीस अडवुन त्याचा मोबाईल हिस्कावुन घेतल्याचे मान्य केल्याने त्याच्या घर झडतीमध्ये एक काळ्या रंगाचा ओपो कंपनीचा अन्ड्राईड मोबाईल जप्त करण्यात आला.

सदर आरोपींकडून जबरी चोरी करण्यासाठी वापरलेले वाहन व जबरी चोरीतील मुद्देमाल दोन अॅन्ड्राईड मोबाईल असा एकूण 1 लाख 5 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपींकडून खालील प्रमाणे दोन गुन्हे अवघ्या काही तासात उघडकीस आले आहेत. सर्व आरोपींना पुढील तपासकामी पोलीस ठाण्यात सदर बाजार येथे हजर केले असून पुढील तपास पोलीस ठाणे सदर बाजार करीत आहेत. आरोपींकडून जबरी चोरीचे अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाल, सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, व पोलीस अमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, कैलास खाडे, दिपक घुगे, सचिन चौधरी, सुधिर बाघमारे, कैलास चेके, योगेश सहाने, धिरज भोसले चालक अमलदार संजय राऊत सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.