घाटकोपर होर्डिंग प्रकरण : भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत 29 मे पर्यंत वाढ

मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याने 17 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. भावेश भिंडेची कोठडी 29 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.

घाटकोपर होर्डिंग कोसळल्यानंतर भावेश भिंडे हा फरार झाला होता. लोणावळा, कल्याण शिळफाटा, अहमदाबाद असा प्रवास करत त्याने उदयपूर गाठले. आणि उदयपूर येथील एका हॉटेलमध्ये लपून बसला. भिंडेला पकडण्यासाठी पोलिसांनी 7 पथके तयार केली होती. अखेर उदयपूर येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. भावेश भिंडेकडे दुर्घटनाग्रस्त होर्डिंगची जबाबदारी होतीच. पण त्याचबरोबर इतर 3 ते 4 होर्डिंगचीही जबाबदारी होती. या न्यायालयाने भिंडेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनवाली होती. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याची कोठडी आणखी तीन दिवसांनी वाढवली आहे.