ऐतिहासिक राजवाड्यातून सोन्याचा संडास गेला चोरीला

सोन्याचे दागिने, नाणी आणि रोखीसाठी आजवर चोऱ्या-दरोडे झालेले ऐकले असतील. पण, चोरांनी चक्क सोन्याचा संडास पळवून नेल्याची घटना एका राजवाड्यात घडली आहे. या संडासाची किंमत 50 कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे.

ही घटना युनायटेड किंग्डमच्या ब्लेनहेम पॅलेस या राजवाड्यात घडली आहे. हा राजवाडा माजी पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांचं जन्मस्थान म्हणून ओळखला जातो. या राजवाड्यात असलेला सोन्याचा एक कमोड चोरीला गेला आहे. द स्काय न्यूजनुसार, या कमोडचं नाव अमेरिका असं होतं. त्याला इटालियन कलाकार मॉरजियो कॅटेलन याने बनवलं होतं.

या कमोडला 2016मध्ये न्यूयॉर्कच्या गुगेनहेम संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आलं होतं. तिथे येणारे पाहुणे त्याचा वापरही करू शकत होते. या संडासासाठी विशेष सुरक्षा रक्षकही नेमण्यात आले होते. त्यानंतर काही काळ डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी तो व्हाईट हाऊसमध्येही ठेवण्यात आला होता. सध्या तो ब्लेनहेम राजवाड्यात ठेवण्यात आला होता. राजवाड्याची सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या संस्थेने या चोरीबाबत तक्रार नोंदवली असून चार जणांवर संशय व्यक्त केला आहे. या चौघांना 28 नोव्हेंबर रोजी ऑक्सफर्ड मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.