सरकारचा विकासरथ नागरिकांनी रोखला; प्रश्नांच्या भडिमारामुळे अधिकारी निरुत्तर

केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेला देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रचाररथ गावोगावी निघत आहे. मात्र, प्रत्यक्षात विकास कुठे आहे, विकासरथ दिसत आहे, विकास कोठे आहे. तसेच अनेक प्रश्न यातील प्रचारक अधिकाऱ्यांना आता गावकरी विचारत आहेत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांमुळे प्रचारकच निरुत्तर झाल्याचे दिसून येत आहे.

विकासकामांची माहिती देण्याच्या नावाखाली सध्या गावोगावी भाजपचे प्रचाररथ फिरत आहेत. त्यामुळे देशात भारत सरकार आहे की मोदी सरकार, हे एका व्यक्तीचे सरकार आहे ? असा सवाल नागरिक करत आहे. तसेच विकासाबाबतही नागरिकांनी केलेल्या प्रश्नांमुळे निरूत्तर होत काढता पाय घ्यावा लागत आहे. राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोलीसारख्या छोट्या गावात सरकारी अधिकाऱ्यांच्या थाटात येत जाहिरातबाजी करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यावर एका युवकाने प्रश्नांची सरबत्ती करताच,त्याला मोदींच्या विकास कामाचा रथ अक्षरशः गुंडाळावा लागला. ग्रामस्थ सुद्धा त्या युवकाच्या पाठीशी ठाम राहिल्याचे दिसून येत आहे.

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना या निमित्ताने भाजपचे प्रचारक बनवले जात असल्याची चर्चा होत आहे. नोकरीचा प्रश्न असल्याने हे सर्व अधिकारी दिलेले काम करत आहेत. जिल्ह्यात विविध गावांत शासकीय अधिकाऱ्यांतर्फे केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत भाजपचे जिल्हाबाहेरील अजित वागवे नावाचे समन्वयक एका वाहनांवर भव्य एलसीडी स्क्रीन घेऊन, एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांच्या थाटात सोन्याची शिरोली गावात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले कॅलेंडर हातात देत ग्रामस्थांचे फोटोसेशन करण्यात येत होते. गावातील जागरुक तरुण राजवैभव शोभा रामचंद्र याने यावर आक्षेप घेतला. हा विकासकामांचा गावात आणलेला रथ नेमका भारत सरकारचा आहे की मोदी या एकाच व्यक्तीच्या नावाने असलेल्या सरकारचा आहे ?, भारत सरकारचा असेल तर त्यावर भारत सरकार असा उल्लेख का नाही ?,केवळ मोदी सरकार म्हणुनच का उल्लेख आहे ?,यामध्ये रंगाच्या बाबतीत ही भाजप पक्षाशी निगडित रंगाचा समावेश आहे. तिरंगा का नाही ?,यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आला आहे काय ? अशा एका मागून एक प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी अधिकारी म्हणून आलेल्या त्या समन्वयकाची चांगलीच भंबेरी उडाली.

त्यातच त्यांनी मोदी सरकारने गॅस सिलेंडर घराघरात पोहोचवल्याचे सांगितले. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी चारशे रुपयांवर असलेला गॅस सिलेंडरचा दर आज हजार रुपयांच्यावर कसा गेला ? , आरोग्याच्या योजनांवरून कसा खेळखंडोबा सुरू आहे, यावरून नागरिकांनी त्यांना धारेवर धरले. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजवैभवला पोलिसांची भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थच राजवैभवच्या पाठीशी ठाम राहिले. अखेर अधिकारी म्हणून आलेल्या त्या भाजपच्या समन्वयकाला मोदींच्या विकास कामांचा रथ गुंडाळून गावातून निघून जावे लागले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होऊ लागल्याने,याची सर्वत्र चर्चा होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

सरकारी पैशातून भाजपचा प्रचार सुरू आहे काय ? सर्वांनीच या विरोधात आवाज उठवला पाहिजे
इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेला राजवैभव शोभा रामचंद्र हा सोन्याची शिरोली गावचा तरुण संविधान संवाद समितीमार्फत राज्यभरात जनजागृतीचे काम करत आहे. त्याच्याच गावात विकास कामांचा रथ घेऊन आलेल्या या भाजपच्या प्रचारकांचा थाट पाहून त्याने दिखाव्याचा बुरखा फाडत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. शासकीय योजना तळागाळापर्यंत प्रसारित करण्यासाठी सर्व पैसे अशा माध्यमातून शासनाच्या तिजोरीतून जात आहे. यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाला लावल्याचे दिसून येत आहे. अधिकाऱ्यांच्या थाटात येणाऱ्या अधिकाऱ्यांच्यामुळे सर्वसामान्य लोकांवर त्यांचा प्रभाव पडत असला तरी सरकारी पैशातून भाजपचे प्रचाराचे काम सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अशा कामासाठी शासनाचा किती पैसा खर्च होत आहे या संदर्भात माहिती अधिकार वापरण्यासह सर्वांनीच जाब विचारणे गरजेचे असल्याचे राजवैभव यांनी सांगितले. ग्रामस्थ आपल्या पाठीशी ठाम आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे) उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख सुनील शिंदे यांनीही आपल्याशी संपर्क साधून आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिल्याचे राजवैभव यांनी सांगितले.