जागावाटपावरून महायुतीत महागोंधळ; राज्यातील भाजप नेते दिल्लीकडे रवाना

eknath shinde devendra fadnavis ajit pawar

लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. अशात जागावाटपाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. राज्यात महायुतीमध्ये महागोंधळ झाला असून जागावाटपचा तिढी सुटेना अशी गत झाली आहे. मिंधे गट आणि अजित पवार गट भाजपकडून जागा मिळवण्यासाठी धडपडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात येऊन गेल्यानंतर देखील प्रश्न कायम आहे. मिंधे 13 जागा मिळाव्यात म्हणून धडपडत आहेत. दुसरीकडे, अजित पवार गट 9 जागांसाठी आग्रही आहे. भाजप 32 जागांवर ठाम असल्यानं सोबत गेलेल्या गटाची गोची झाली आहे.

या दरम्यानच आज अमित शहा यांच्या गाडीतून सीएम एकनाथ शिंदे यांनी प्रवास केला. त्यांच्यासोबत दीपक केसरकर सुद्धा होते. याच गाडीत अजित पवार सुद्धा होते, अशी देखील चर्चा आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत जागावाटप संदर्भात मुंबईत चर्चा झाली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. त्यानंतर भाजपच्या दिल्लीतील कोअर कमिटीच्या बैठकीसाठी राज्यातील भाजप नेते रवाना झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि प्रविण दरेकर हे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. जागा वाटपावर दिल्लीतच अंतिम निर्णय होणार असं बोललं जात आहे.