VIDEO पुढच्या चांद्रयानातून तुम्हाला चंद्रावर पाठवू, मुख्यमंत्र्यांचे वृद्ध महिलेला उद्धटपणे उत्तर

गावाच्या विकासासाठी व महिलांना रोजगार मिळावा यासाठी गावात एखादा कारखाना सुरू करावा अशी मागणी करणाऱ्या एका महिलेला हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी उद्धटपणे उत्तर दिल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

एका कार्यक्रमात सदर महिला सर्वांदेखत मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे एक मागणी करते. ”आमच्या गावात एक कारखाना सुरू करा जेणे करून मला व गावातील अन्य महिलांना रोजगार मिळू शकेल” अशी मागणी ती महिला करते. त्यावर मनोहरलाल खट्टर तिच्यावर हसतात व पुढच्या चांद्रयानाने तुम्हाला चंद्रावर पाठवू असे सांगत तिला बसायला सांगतात.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून काँग्रेसने भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फटकारले आहे. ”भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे विचार बघा. हरियाणातील एका महिलेने मुख्यमंत्री खट्टर यांना त्यांच्या भागात कारखाना सुरू करण्यास सांगितले, जेणेकरून तिला आणि इतर महिलांना काम मिळू शकेल. याला उत्तर देताना मुख्यमंत्री चेहऱ्यावर निर्लज्जपणे हसत म्हणतात – पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला चांद्रयानमध्ये चंद्रावर पाठवू. आणि गरीब महिलेच्या वाजवी मागणीची चेष्टा करताना ते तिला खाली बसण्याची सूचना करतात. मुख्यमंत्री खट्टर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जे वाटते तेच केले. भाजप आणि संघामध्ये महिलांचा सन्मान नाही, त्यांना स्थान नाही. लाज वाटली पाहिजे”, अशी टीका काँग्रेसने केली आहे.