CWC 2023 हार्दिक पंडय़ाची विश्रांती वाढली, इंग्लंड व श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याला मुकण्याची शक्यता

टीम इंडियाचा अष्टपैलू व उपकर्णधार हार्दिक पंडय़ाची पायाला झालेल्या दुखापतीमुळे विश्रांती वाढली आहे. आधी तो इंग्लंडविरुद्ध खेळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, मात्र आता त्याला आगामी दोन लढतींना मुकावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.

बांगलादेशविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत झाली होती. हिंदुस्थानी संघ इंग्लंडविरुद्धनंतर रविवारी लखनौमध्ये, तर 2 नोव्हेंबरला मुंबईत श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहे. तो केवळ दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर नेदरलँड्सविरुद्धच्या साखळी लढतीसाठी उपलब्ध राहण्याची शक्यता आहे.

शार्दुल की अश्विन?
हार्दिकच्या दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. अष्टपैलू हार्दिकमुळे संघाला फलंदाजी आणि गोलंदाजीत समतोल मिळत असतो. अशा परिस्थितीत रोहितच्या जागेवर कोणाला घ्यायचे असा प्रश्न आता कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यापुढे निर्माण झाला आहे. गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही सक्षम असलेल्या शार्दुल ठाकूर आणि रविचंद्रन अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘एंट्री’ देण्याचा पेच टीम इंडियासमोर आहे. अंतिम निर्णय रविवारच्या सामन्यापूर्वीच होईल, पण ठाकूरच्या तुलनेत अश्विन खेळण्याची शक्यता अधिक आहे. न्यूझीलंडविरुद्ध 5 विकेट टिपल्यामुळे मोहम्मद शमीला आता डावलता येणार नाही. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व शमी हे टीम इंडियाचे आघाडीचे गोलंदाज असतील हे निश्चित आहे. शमीने मिळालेल्या संधीचे सोने केले आणि आता त्याकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. अशा स्थितीत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या जागी अश्विनला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील कामगिरीचे मूल्यांकन केल्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.