हरयाणात पोलीस आणि दंगेखोरांमध्ये चकमक; गोळीबारात एक जखमी, दोघांना अटक

हरयाणाच्या नूहमध्ये गुरुवारी पोलीस आणि दंगेखोरांमध्ये चकमक उडाली. गोळीबारात एक जखमी झाला तर पोलिसांनी दोघांना अटक केली. 31 जुलै रोजी अरावली या डोंगराळ भागात झालेल्या हिंसाचारातील आरोपींची शोधमोहीम पोलिसांनी सुरू केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दंगेखोर राजस्थानमार्गे तावडू येथून नुह येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने डोंगराळ भागात त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यात आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुनफेद आणि सैकुल अशी या दोघांची नावे असून दोघांकडून कट्टा, काडतूस आणि बाईक जप्त करण्यात आली आहे. दोघांकडून 4 ते 5 राऊंड फायरिंग झाल्याचे पोलीस अधिकारी कृष्ण कुमार यांनी सांगितले. हे एन्काऊंटर जवळपास तासभर चालल्याचे ते म्हणाले.

आतापर्यंत 188 जणांना अटक

31 जुलै रोजी नूहमध्ये हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली. त्यांचा ठावठिकाणा शोधून पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू झाल्यानंतर आसपासच्या गावांतील अनेकजण डोंगराळ भागात जाऊन लपल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आतापर्यंत हिंसाचारप्रकरणी तब्बल 188 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.