अलर्ट! कोरोना दबक्या पावलांनी येतोय! 24 तासांत कोरोनाचे 752 रुग्ण

जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 4.50 कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 752 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यातील 325 लोक बरे झाले आहेत, तर 4 लोकांचा यात मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 420 आहे. एक दिवसांपूर्वी हा आकडा फक्त 2 हजार 998 होता.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये सर्वात जास्त 565 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 297 रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत, तर 266 लोकांवर अद्याप उपचार सुरू आहेत. कर्नाटकात 70 रुग्णांची नोंद झाली असून केरळनंतर कर्नाटकात सर्वाधिक रुग्ण आहेत. कर्नाटक आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार गेल्या एका महिन्यात कोरोनाच्या रुग्णांत 52 टक्के वाढ झाली आहे. 19 नोव्हेंबर ते 17 डिसेंबरदरम्यान 8 लाख 50 हजार रुग्णांची नोंद झाली आहे, तर 3 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा नवीन जेएन-1 हा व्हेरियंट आतापर्यंत 41 देशांमध्ये पसरला आहे. फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, कॅनडा आणि स्वीडनमध्ये जेएन-1 च्या केसेस जास्त आहेत. 22 डिसेंबरला हिंदुस्थानात नवीन 423 प्रकरणे समोर आली आहेत. यातील 266 प्रकरणे ही केरळमधील आहेत.

लोकांनी गर्दीच्या ठिकाणी, बंद किंवा प्रदूषित ठिकाणी मास्क घालावे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने नागरिकांना दिला आहे. केरळमध्येही नागरिकांना सल्ला देण्यात आला आहे. वृद्ध लोकांनी, मूत्रपिंड, हृदय, यकृत यांसारख्या आजार असलेल्या नागरिकांनी तसेच गर्भवती महिलांनी घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक वापरावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

पंजाबमध्ये मास्क बंधनकारक
देशात हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पंजाबमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंट जेएन-1 ची एण्ट्री झाल्यानंतर पंजाब सरकार खडबडून जागे झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात मास्क घालणे बंधनकारक केले आहे. आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला असून सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. पंजाबमध्ये आतापर्यंत जेएन-1 चे 4 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. राजेश भास्कर यांनी दिली. या 4 रुग्णांपैकी 1 रुग्ण ठीक झाला आहे, तर अन्य 3 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. यातील एक रुग्ण जालंधर, नवाशंकर आणि कपूरथला येथील आहेत. यातील कपूरथलाच्या रुग्णाला डेंग्यू झाला होता.