मला अडीच महिन्यांपासून टॉर्चर केलं जातंय! पटोलेंचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर

नाना पटोले हे भाजपचे हस्तक असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यावर बोलताना पटोले यांनी, गेल्या दोन अडीच- महिन्यांपासून आपल्याला टॉर्चर केले जात असल्याचा गंभीर आरोप आज केला.

नाना पटोले म्हणाले, कॉँग्रेस उमेदवारासाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आम्ही समर्थन मागितलेले नाही. त्यांना द्यायचे तर देऊ शकतात. मी पण वंचित आहे. शेतकऱयाचा मुलगा आहे. मागासवर्गीय आहे. ज्याप्रमाणे गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून मला वैयक्तिकरीत्या टॉर्चर केले जातोय ते योग्य नाही. योग्य वेळेस योग्य उत्तर देईन, असे त्यांनी सांगितले. आंबेडकर यांच्याशी खरगे यांचा काय पत्रव्यवहार झाला याची माहिती माझ्याकडे आहे. दिल्लीचे नाव सांगून काही गोष्टी लपवायच्या असे काही तरी असेल मला माहीत नाही.

महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे लढत आहोत. त्यामुळे आम्हाला पाठिंबा आणि दुसऱयांना नाही असे चालत नाही. द्यायचा तर सर्वांना पाठिंबा द्यावा लागेल. भाजपशी छुपा संबंध कुणाचा कुणाशी संबंध हे दोन दिवसांत आम्ही मांडू, असे आंबेडकर यांनी केलेल्या आरोपांबाबत पटोले म्हणाले.