WC 2023 – आता लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफीचे, खचलेल्या इंग्लंडसमोर दुबळय़ा नेदरलॅण्ड्सचे आव्हान

सातपैकी सहा सामने गमावल्यामुळे जगज्जेत्या इंग्लंडला वर्ल्ड कपमध्ये साखळीतच बाद होण्याची नामुष्की सहन करावी लागली. आता इंग्लंडवर दुसरेही संकट ओढावले असून नेदरलॅण्ड्सविरुद्ध विजय न मिळविल्यास त्यांना आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतूनही बाहेर पडावे लागणार आहे. इतकी नाचक्की त्यांची कधीच झाली नव्हती. किमान उरली अब्रू वाचवण्यासाठी इंग्लंडला आपले सर्वस्व पणाला लावावेच लागणार आहेत. अन्यथा एकापाठोपाठ दुसरा धक्काही त्यांना बसल्याशिवाय राहणार नाही. दुसरीकडे ब्रिटिशांना नमवून डच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरू शकतात. त्यामुळे आठवा संघ कोणता असेल ते कळेलच.

वर्ल्ड कप सुरू होण्याआधी इंग्लंडचा संघ सर्वात बलाढय़ संघ म्हणून गणला जात होता. सर्वच दिग्गजांच्या मुखी उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघाच्या यादीत इंग्लंडचे हमखास नाव होतेच. पण हिंदुस्थानात दाखल झाले आणि ऑक्टोबर हीटमध्ये त्यांचा संघ असा काही होरपळला की त्यांना लढणं सोडा, साधं खेळणंसुद्धा जमलं नाही. त्यामुळेच त्यांना आपलं भवितव्य नेदरलॅण्ड्ससारख्या अननुभवी संघाबरोबरच्या सामन्याद्वारे ठरवावे लागणार आहे. 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार असून या वर्ल्ड कपमध्ये अव्वल सात संघांचा समावेश असेल. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान भूषवत असल्यामुळे  त्यांना थेट प्रवेश दिला जाणार असून अन्य अव्वल सात संघच चॅम्पियन्स स्पर्धेसाठी पात्र ठरतील, असे आयसीसीने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या दहाव्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या नेदरलॅण्ड्सविरुद्धच्या विजयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

इंग्लंडचे खचलेले मनोधैर्य नेदरलॅण्ड्ससाठी फायद्याचे ठरू शकते. याच स्थितीचा फायदा उठवण्यासाठी सज्ज आहेत. वर्ल्ड कपमध्ये समाधानकारक यश मिळवता आले नसले तरी चॅम्पियन्स ट्रॉफीत स्थान मिळवणे, त्यांचेही स्वप्न आहे. वर्ल्ड कपची ही ऑरेंज आर्मी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयामुळे चर्चेत आली होती. बांगलादेशविरुद्धही त्यांचा विजय काwतुकास्पद होता. त्यांनी आपल्या परीने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला, पण अनुभव कमी पडला. स्पर्धेत त्यांच्या गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी केली असली तरी त्यांच्या फलंदाजांचे अपयश लपवणे कठीण आहे. त्यांची फलंदाजी खूपच कमकुवत ठरली आहे.

इंग्लंडचे मनोधैर्य खचलेले

पाच पराभवांमुळे इंग्लंडचा संघ सर्वप्रथम वर्ल्ड कपमधून बाहेर पडलाच होता. त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध जोरदार खेळाची अपेक्षा होती, पण तेथेही ते कमीच पडले. जॉनी बेअरस्टॉ, डेव्हिड मलान सातत्याने धडाकेबाज सलामी देण्यात अपयशी ठरताहेत. ज्यो रुटही आपल्या लौकिकानुसार खेळत नाहीय. कर्णधार जोस बटलरलाही स्पर्धा संपायला आली पण सूरच सापडला नाही. बेन स्टोक्सला जबरदस्ती निवृत्ती मागे घ्यायला लावणेही इंग्लंडच्या हिताचे ठरलेले नाही. कोणतीही गोष्ट इंग्लंडच्या पथ्यावर न पडल्यामुळे त्यांचे मनोधैर्य खचलेलेच आहे. त्यामुळे अशा स्थितीत ते उर्वरित सामने किती जोशाने खेळतील, हासुद्धा प्रश्न आहे.

इंग्लंडची दारुण कामगिरी

जगज्जेता इंग्लंड वर्ल्ड कपच्या इतिहास कधीही सहा सामने हरला नव्हता. त्यांचे अजून दोन सामने शिल्लक असून डचविरुद्धही ब्रिटिशांना दावेदार मानले जात नाहीय. विजयाची गोष्ट केवळ डचवरच अवलंबून नाहीय, तर त्यांचा अखेरचा साखळी सामना पाकिस्तानविरुद्ध आहे आणि पाकिस्तानसाठीही हा सामना करो या मरो असाच आहे. हे दोन्ही सामने इंग्लिश संघासाठी निश्चित सोपे नाहीत. चॅम्पियन्स ट्रॉफीत स्थान मिळवायचे असेल तर त्यांना एक नव्हे तर दोन्ही सामन्यांत विजय महत्त्वाचा आहे. कारण त्यांच्यावर असलेल्या तिन्ही संघांनी दोन विजय नोंदविले असून त्यांनी तीन विजय मिळवले तरच ते अव्वल आठ संघांत स्थान मिळवू शकतील.