उडता हिंदुस्थान! ‘वाडा’च्या अहवालात दोषी खेळाडूंच्या यादीत हिंदुस्थान नंबर वन

क्रीडा क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱया हिंदुस्थानी क्रीडा जगताची मान झुकवायला लावणारा ‘वाडा’चा उत्तेजक चाचणीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेच्या (वाडा) वतीने जाहीर करण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीबाबतच्या अहवालात हिंदुस्थानचे सर्वाधिक खेळाडू दोषी आढळल्याने तमाम क्रीडाप्रेमींची मान शरमेने झुकली आहे.

‘वाडा’तर्फे हिंदुस्थानी खेळाडूंच्या 3 हजार 865 उत्तेजक चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी 125 खेळाडू दोषी आढळून आले आहेत. हे प्रमाण टक्केवारीमध्ये 3.2 इतके आहे. हिंदुस्थानच्या खालोखाल दक्षिण आफ्रिकन खेळाडूंचा नंबर लागलाय. आफ्रिकन खेळाडूंच्या घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचण्यांमध्ये 2.9 टक्के खेळाडू दोषी आढळून आले आहेत.

या उलट रशिया, अमेरिका, इटली व फ्रान्स या महत्त्वाच्या क्रीडासाठी ओळखल्या जाणाऱया देशांतील खेळाडू कमी प्रमाणात दोषी सापडले आहेत. रशियातील 85, अमेरिकेतील 84, इटलीतील 73 व फ्रान्समधील 72 खेळाडू दोषी सापडले आहेत. चीनमधील खेळाडूंच्या सर्वाधिक 19 हजार 228 चाचण्या घेण्यात आल्या, मात्र 0.2 टक्के खेळाडूच यामध्ये दोषी सापडले आहेत. जर्मनीतील खेळाडूंच्या 13 हजार 653 चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील 0.3 टक्के खेळाडू यामध्ये दोषी सापडले.

‘वाडा’चा वार्षिक अहवाल हा अचूक आहे. कोरोनाआधी जेवढय़ा चाचण्या घेण्यात येत होत्या त्याच तोडीच्या चाचण्या घेतल्या आहेत, असे ‘वाडा’चे सरसंचालक ओलिव्हिएर निगली यांनी सांगितले.

हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक मोहिमेला हादरा

 गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानी खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात सोनेरी कामगिरी करत अवघ्या जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे, मात्र ‘वाडा’च्या अहवालामुळे खेळाडू जोरदार कामगिरीसाठी उत्तेजक घेत असल्याचे समोर आल्याने हिंदुस्थानची प्रतिमा डागाळली. त्यामुळे हिंदुस्थानच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाणार, यात तीळमात्र शंका नाही. एवढेच नव्हे तर ऑलिम्पिक मोहिमेवर असलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष आपोआप वेधले जाण्याची शक्यता आहे.