महालक्ष्मी मंदिराजवळ पादचारी पूल बांधा! भाविक, रहिवाशांची राज्य, पालिकेकडे मागणी

मुंबईसह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भुलाभाई देसाई मार्गावरील महालक्ष्मी मंदिराजवळ मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्याचबरोबर पादचारी आणि रहिवाशांना रस्ता ओलांडणे जिकरीचे झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी मंदिराजवळ पादचारी पूल बांधून दिलासा द्यावा, अशी मागणी भाविक आणि स्थानिकांनी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडे केली आहे.

सणवार तसेच नवरात्री उत्सवावेळी मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. समोरचे दोन्ही रस्ते हे मुख्य रस्ता आणि चौकाला लागून असल्यामुळे दरदिवशीही वाहनांची प्रचंड गर्दी सकाळी आणि संध्याकाळी-रात्रीपर्यंत होत असते. अशा वेळी स्थानिक रहिवासी आणि येणाऱया भाविकांना मंदिरात येता-जाताना मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो. टॅक्सी स्टॅण्ड असल्यामुळे वाहतूककाsंडी होते. मंदिराच्या बाजूला रस्ता ओलांडताना वळण असल्यामुळे भाविक, रहिवासी, विद्यार्थी, पर्यटकांना अंदाज येत नाही आणि अपघातासारख्या दुर्दैवी घटना घडतात.

मंदिर परिसराचा विकास करताना पूल बांधा

मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांचा विकास करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई महापालिकेला 60 कोटींचा निधी दिला आहे. या निधीतून मंदिर परिसराचा विकास करताना राज्य सरकारने भाविक, रहिवासी आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून मंदिर परिसराला जोडणारा पादचारी पूल बांधण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला द्यावेत आणि दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.