छोडो कल की बातें…वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेला आजपासून प्रारंभ

 ‘छोडो कल की बातें… कल की बात पुरानी…नये दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी…’ हेच गाणं टीम इंडियाचा नव्या दमाचा दमदार संघ गुणगुणतोय. गेल्याच महिन्यात झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अपयश हिंदुस्थानी संघाच्या जिव्हारी लागल्यामुळे निवड समितीने नव्या संघबांधणीचा श्रीगणेशा याच दौऱयापासून केला जाणार असल्याचे संकेत आधीच मिळाले आहेत. त्यामुळे बुधवारपासून सुरू होणारी कसोटी मालिका टीम इंडियासाठी निव्वळ नवा दौरा नसून ‘नया दौर’ आहे. भावी पिढीचा पाया याच दौऱयापासून रचण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.

गेल्या विंडीज दौऱयावर हिंदुस्थानी संघात खेळलेले के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मासारखे दिग्गज वर्तमान संघात नाही आहेत. 2019 साली खेळलेल्या संघातील केवळ विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा हे तिघेच वर्तमान संघात आहेत. एवढेच नव्हे तर डब्ल्यूटीसी अंतिम सामना खेळलेल्या संघातील निम्मा संघ विंडीज दौऱयावर नाहीय. त्यामुळे ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ म्हणत युवा खेळाडूंना आपला जोश दाखवण्याची पुरेपूर संधी या दौऱयात दिली जाणार आहे.

सलामीला कोण यशस्वी होणार

के. एल. राहुलच्या अनुपस्थितीत शुभमन गिलच सलामीला येईल आणि त्याच्या जोडीला कर्णधार रोहित शर्मा असेल. यशस्वी जैसवालला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळणार, यात वाद नाही. पण पुजाराच्या जागी संघात आपले स्थान निर्माण करण्याचा दबाव या नवख्या जैसवालवर असेल आणि तो यात यशस्वी होईल, अशी देहबोली विंडीज दौऱयात दिसतेय. असे असले तरी सलामीला कोण उतरणार, हे उद्याच कळू शकेल. फॉर्मात नसलेला रोहित आपला फॉर्म मिळविण्यासाठी सलामीला उतरेल की यशस्वीला संधी देईल. असे झाले तर तिसऱया क्रमांकावर ऋतुराज गायकवाडला उतरवण्याचीही शक्यता आहे. पण खुद्द रोहित शर्मा कोणत्या स्थानावर खेळेल, हासुद्धा प्रश्न कायम आहे. एकाच वेळी संघात इतके बदल होणे कठीण आहे.

गोलंदाजीला धार दाखवण्याची संधी

संघाची गोलंदाजी कागदावर कमकुवत भासतेय. ना बुमराह आहे ना शमी. हिंदुस्थानी गोलंदाजीचा भार मोहम्मद सिराजच्या खांद्यावर आहे. त्याचा सोबतीला शार्दुल ठाकूरबरोबर नक्की कोण असेल याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि जयदेव उनाडकटपैकी एकाची निवड करताना संघ व्यवस्थापनाला फारच परिश्रम करावे लागणार आहेत. मात्र उद्या मैदानात हिंदुस्थानचे दोन्ही रवी तळपतील, असा विश्वास आहे. दोघांचा फिरकी माराच हिंदुस्थानची खरी ताकद असेल,

वेस्ट इंडीजचा संघ कागदावर आणि मैदानातही दुबळा असल्यामुळे हिंदुस्थानी संघ सामना कितव्या दिवशी संपवतात, हाच प्रश्न उरला आहे. मात्र हे कसोटी सामने पाचव्या दिवसापर्यंत पोहोचले तरी विंडीजच्या खेळाडूंचे कौतुक करावे लागेल. हिंदुस्थानचा संघ नव्या दमाचा आहे, पण विंडीजचा संघ नवखा आहे. त्यांच्याकडून कुणालाही फारशा अपेक्षा नाहीत. अशा संघाला हिंदुस्थानी खेळाडू चिरडतात की विंडीजचे खेळाडू घरच्या मैदानावर डरकाळी फोडतात, हे पाहणे मजेशीर असेल.

हिंदुस्थान नॉनस्टॉप

विंडीज दौऱयात हिंदुस्थानी संघाची गेल्या काही वर्षांतील कामगिरी जबरदस्त आहे. 2000 सालापासून पाच कसोटी मालिका खेळला आहे आणि त्यापैकी चार मालिकांमध्ये जोरदार यश मिळवलेय. 2002 चे अपयश वगळता 2006, 2011, 2016 आणि 2019 मध्ये हिंदुस्थान जिंकला आहे. विंडीज दौऱयातील नॉनस्टॉप विजयाची मालिका यंदाही कायम राहणार, यात वाद नाही.

विराट कोहलीचा पितापुत्रासोबत खेळण्याचा दुर्मिळ योग

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 1992 साली जेफ मार्शविरुद्ध खेळला होता तर 2011-12 मध्ये त्यांचा थोरला मुलगा शॉन मार्शविरुद्ध खेळून पिता-पुत्रांबरोबर खेळण्याचा अनोखा विक्रम केला होता. आता तसाच दुर्मिळ विक्रम करण्याची कोहलीला चालून आली आहे. पहिल्या कसोटीत टॅगनरीन चंदरपॉल खेळला तर कोहलीसुद्धा पिता-पुत्रांविरुद्ध खेळणारा खेळाडू ठरेल. 2011 साली कोहली आपल्या पदार्पणाच्या दौऱयातच शिवनरीन चंदरपॉलविरुद्ध खेळला होता आणि त्याच्या मुलाविरुद्धही खेळणार आहे.