भाजपला सहज हरवणार – राहुल गांधी

2024 च्या निवडणुकीत इंडिया आघाडीसमोर भारतीय जनता पक्षाला जिंकताच येणार नाही, मोदींचा पराभव अटळ आहे, असे याप्रसंगी काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. त्याचे गणितही त्यांनी यावेळी मांडले. ‘इंडिया’ आघाडीत समावेश असलेले राजकीय पक्ष हे देशातील 60 टक्के जनतेचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे साहजिकच ‘इंडिया’ आघाडीचा दणदणीत विजय होऊ शकतो, असे ते म्हणाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे यावेळी राहुल गांधी यांनी मुंबईतील बैठकीबद्दल आभार मानले. बैठकीची व्यवस्था उत्तम प्रकारे केली गेल्याचे ते म्हणाले. आता आगामी निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच तयार करण्यात येईल. त्यासाठी एक समन्वय समिती निर्माण करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. या बैठकांमुळे देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये सुसंवाद वाढला, याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.

शेतकऱयांसाठी आम्ही काम करणार

देशाच्या विकासासाठी शेतकरी, कामगार आणि देशातील गरीब जनतेचा मोठा हात असतो. त्यांच्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत, आम्ही ‘इंडिया’साठी एकत्र आलो आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.

भाजप हे भ्रष्टाचाराचे घर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप हे भ्रष्टाचाराचे घर झाले असून भाजप सरकार गरीबांचे पैसे उद्योगपतींना देत आहे, असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी यांनी अदानी यांची चौकशी करायला पाहिजे, अशी मागणी करतानाच, त्यांनी चौकशी केली नाही तर मोदी-अदानी मिलिभगत असल्याचे स्पष्ट होईल, असे राहुल गांधी म्हणाले.

चीन घुसतोय, पण मोदी सरकार मूर्ख बनवतेय

‘चीनने लडाखच्या पेंगाँग सरोवराजवळील सीमेवर हिंदुस्थानची जमीन बळकावली आहे. आपण लडाखला गेलो होतो तेव्हा तेथील नागरिकांनी आपल्याला ती माहिती दिली होती. चिनी लोक आपल्याच जमिनीवर कब्जा करून आपल्या नागरिकांना तिथे येऊ देत नाहीत तरीही मोदी सरकार मात्र तसे काहीच झाले नसल्याचे सांगत देशातील जनतेला मूर्ख बनवत आहे,’ असे राहुल गांधी म्हणाले.

मोदी थापेबाज… एक्स्पोज करणार – खरगे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थापेबाज असून त्यांना एक्स्पोज करणारच, असा इशारा यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला. यावेळी मोदी यांना त्यांनी मराठीतून टोला लगावला. ‘मोदी नेहमी खोटं बोलतात, पण लोकांना ते खरं वाटतं. मराठीत एक म्हण आहे, ‘खोटे बोला पण रेटून बोला.’ मोदींचं पण तसंच आहे,’ असे खरगे बोलताच सभागृहात हशा पिकला. मोदींनी तोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ‘इंडिया’ मजबुतीने काम करत राहील, असे ते म्हणाले.

महागाई, बेरोजगारीविरुद्ध लढणे हाच ‘इंडिया’ आघाडीचा उद्देश आहे असे खरगे यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘मोदी हे 100 रुपये वाढवतात आणि 2 रुपये कमी करतात. मोदी हे गरीबांसाठी नाही, तर उद्योगपतींसाठी काम करतात. गरीबांचे 75 हजार कोटी रुपये त्यांनी अदानींच्या खिशात कसे गेले, त्यांची संपत्ती कशी वाढली असा सवाल करतानाच, गरीबांचा पैसा उद्योगपतींच्या घशात जाण्यापासून रोखण्यासाठीच आम्ही एकत्र आलोय,’ असे खरगे म्हणाले.

मणिपूर, कोरोना, नोटबंदीवेळी विशेष अधिवेशन का नाही?

संसदेच्या विशेष अधिवेशनावरूनही खरगे यांनी मोदींवर निशाणा साधला. मणिपूर जळत होते, कोरोनाने थैमान मांडले होते, नोटबंदीमध्ये सामान्य जनता हैराण झाली होती, चीन आपल्या जमिनीवर कब्जा करतेय तेव्हा विशेष अधिवेशन बोलावण्यात आले नाही, देशासमोर संकट होते तेव्हा विशेष अधिवेशन बोलवण्यात आले नाही, असे ते म्हणाले.

ही आघाडी 140 कोटी जनतेची – केजरीवाल

इंडिया आघाडी ही केवळ 28 पक्षांची नसून देशातील 140 कोटी जनतेची आहे असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या वेळी म्हणाले. एकविसाव्या शतकातील हिंदुस्थानच्या निर्मितीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले. केजरीवाल हे या वेळी पेंद्रातील मोदी सरकारवर तुटून पडले. मोदी सरकार हे स्वतंत्र हिंदुस्थानातील सर्वात भ्रष्ट आणि अहंकारी सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली. केवळ एक माणूस मनमानी पद्धतीने देश चालवतोय आणि सर्व सरकार जनतेऐवजी या एका माणसासाठी काम करतेय हे पाहून दुःख होते, असे ते म्हणाले. इंडिया आघाडीमध्ये कोणतेही भांडण नसून इथे कोणताही नेता पदाच्या लालसेने आलेला नाही, केवळ 140 कोटी जनतेच्या विकासासाठी पुढे आलेत. भविष्यात पूर्ण हिंदुस्थान एक होऊन अहंकारी, हुकूमशाही मोदी सरकारचे पतन करेल, असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.

आघाडीत आणखी पक्ष येतील – सीताराम येचुरी

भविष्यात इंडिया आघाडीमध्ये देशातील आणखी पक्ष सहभागी होतील असा विश्वास यावेळी माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी आणि भाजपाविरुध्द देशातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले असून ही लढाई पुढे सुरू राहील असे ते म्हणाले. आम्ही लोकांपर्यंत पोहोचून आघाडी आणखीन मजबूत करू आणि येत्या काळात देशातील जनतेला आघाडीच्या संयुक्त कृती दिसून येतील, असे येचुरी म्हणाले.

मोदी सरकार हरणार हे आता निश्चित – नितीश कुमार

पेंद्रामधील मोदी सरकार आता हरणार हे आज निश्चित झाले असल्याचे या वेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले. मोदी सरकार देशाचा इतिहास बदलू पाहतेय, पण आम्ही ते होऊ देणार नाही, असे त्यांनी बजावले. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करणे, हिंदू-मुस्लीम अशा सर्वांना एकजूट करून पुढे जाणे हाच इंडिया आघाडीचा उद्देश आहे, असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले. इंडिया आघाडीतील राजकीय पक्षांकडून होणाऱया चांगल्या कामांनाही प्रसिध्दी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी या वेळी प्रसारमाध्यमांना केली.

मोदी को हटाके ही दम लेंगे-लालूप्रसाद यादव

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनीही यावेळी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मोदींनी देशातील नेत्यांना ईडी, सीबीआयच्या जाळय़ात फसवले, पण मी घाबरणार नाही. मोदींना हटवूनच शांत राहू, असे लालूप्रसाद म्हणाले.

लालूप्रसाद यादव यांनी यावेळी आपल्या मिश्कील शैलीत पंतप्रधान मोदी यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘मोदी हे खोटे बोलून, अफवा पसरवून सत्तेत आले. स्वीस बँकेतील काळा पैसा आणून देशातील प्रत्येकाच्या नावावर पंधरा लाख रुपये देणार होते. त्यात आम्ही सगळे फसलो. मीसुद्धा बँकेत खाते उघडले. माझी पत्नी आणि मुले मिळून अकरा खाती उघडली. देशातील सर्व गरीबांनी खाती उघडली, पण एक पैसाही मिळाला नाही. लालूंच्या या मिश्किलीवर व्यासपीठावर मान्यवरांसह माध्यम प्रतिनिधींमध्येही हशा पिकला.

इस्रोने मोदींना सूर्यावर पाठवावे

देशात इतकी गरिबी आहे तरी मोदी म्हणतात की, देश पुढे जातोय. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर यान पाठवले. आता त्यांनी मोदींना सूर्यावरती पाठवावे. त्यांचे नाव जगभर होऊ दे, अशी टिप्पणीही लालूप्रसाद यांनी यावेळी केली.

इंडिया आघाडी एक आहे आणि एकत्र लढेल असे सांगतानाच, स्वतःचे नुकसान झाले तरी चालेल, पण आघाडीतील पक्ष ‘इंडिया’ला विजयी करतील, असा विश्वास यावेळी लालूप्रसाद यांनी व्यक्त केला.

मोदी सरकारच्या काळात देशातील अल्पसंख्याक नागरिक सुरक्षित नाहीत असे सांगत लालूप्रसाद यादव यांनी गुजरात दंगलीचा दाखला यावेळी दिला. गुजरात दंगलीच्या वेळी संसदेत आपण मोदींविरुद्ध कारवाईची जोरदार मागणी केली होती, परंतु भाजपवाल्यांनी गुजरात नरसंहाराचा निषेधही केला नव्हता, असे ते म्हणाले.

पवारजी, डटे रहिये!

लालूप्रसाद यादव यांनी भाषणाच्या शेवटी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी लढत राहावे. ते जुने नेते आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे लालूप्रसाद म्हणाले.