महागाई आणखी भडकणार! विकास दर 6.3 टक्के राहणार

चालू आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये हिंदुस्थानाचा आर्थिक विकास दर 6.3 टक्के कायम राहील, असा अंदाज अमेरिकन रेटिंग एजन्सी ‘फिच’ने व्यक्त केला आहे. मात्र, महागाईबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘एल निनो’चा परिणाम पावसावर झाला आहे. त्यामुळे महागाई आणखी भडकू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी पहिल्या तिमाहिचे जीडीपीचे आकडे जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये एप्रिल-जून या तिमाहीत हिंदुस्थानचा आर्थिक विकास दर 7.8 टक्के होता. ‘फिच’ रेटिंगच्या ताज्या आकडेवारीनुसार 2023-24 मध्ये विकास दर 6.3 टक्के राहिल, असा अंदाज आहे. विकास वाढीचा वेग कमी झाल्याचे दुसऱया तिमाहित (जुलै ते सप्टेंबर) स्पष्ट होते. निर्यातीत कमकुवतपणा हे यामागचे कारण असल्याचे ‘फिच’ने म्हटले आहे. पुढील आर्थिक वर्षांत 2024-25 मध्ये जीडीपी 6.5 टक्के राहील, असा अंदाज आहे. मात्र, खरी चिंता महागाई वाढीची आहे. दरम्यान, ‘फिच’ने जागतिक अर्थव्यवस्थेचा वाढीचा अंदाज 0.1 टक्क्यांनी वाढवून 2.5 टक्के केला आहे.

चीनची अर्थव्यवस्था संकटात आहे. चीन स्वतःहा बुडतोय पण हिंदुस्थानसह जगाचे यामुळे टेन्शन वाढवतोय, असे फिच रेटिंगने म्हटले आहे. चीनच्या आर्थिक दुर्दशेचा परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याची भिती आहे.

‘एल निनो’चा धोका

‘एल निनो’चा फटका खरिप हंगामाला बसला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याचे खरीप पिके धोक्यात आहेत. यामुळे खरिपाचे उत्पादन कमी होईल, अशी शक्यता आहे. ‘फिच’ने वर्षाअखेरीस महागाई वाढू शकते, असा अंदाज वर्तविला आहे. z अन्नधान्याच्या किंमती वाढल्यामुळे कुटूंबाच्या खर्चावर परिणाम होईल.