दोन लाखांची लाच घेताना ट्रप; मुलुंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक व अंमलदार रंगेहाथ सापडले

 

गुह्याच्या तपासात मदत करतो, -गुन्हय़ाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करतेवेळी कलमे कमी करू तसेच अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर अटक न करण्यासाठी संबंधिताकडे 25 लाखांची मागणी करून तडजोडीअंती 11 लाख मागितले. त्यापैकी दोन लाखांचा पहिला हप्ता घेताना मुलुंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक भूषण दायमा (40) आणि अंमलदार रमेश बतकळस (46) या दोघांना अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

दिनकर (नाव बदललेले) याच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. त्या गुह्याच्या तपासात मदत करून गुह्याचे स्वरूप कमी करतो नाहीतर अटकपूर्व जामीन रद्द झाल्यास अटक करू, असे निरीक्षक भूषण दायमा (40) आणि अंमलदार रमेश बतकळस (46) यांच्याकडून दिनकर यांना सांगण्यात आले. 11 लाख दिले तर मदत करू असेही सांगितले. परंतु लाच द्यायची नसल्याने दिनकर यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. त्यानुसार अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाकडून तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी लोकसेवकांनी दिनकर यांच्याकडे तडजोडीअंती 11 लाखांची मागणी करून पहिला हप्ता म्हणून दोन लाख स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने शुक्रवारी सापळा लावून पोलीस निरीक्षक भूषण दायमा आणि अंमलदार रमेश बतकळस अशा दोघांना दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांविरोधात लाच मागून ती स्वीकारल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.