पक्षांतर बंदी कायदा मजबूत करण्याऐवजी त्यांनी पक्षांतराचा राजमार्ग केला; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आमदार अपात्रताप्रकरणी निकाल जाहीर केला आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची मिलीभगत झाली असून निकाल काय येणार हे स्पष्ट असल्याचे आपण म्हटले होते. आजच्या निकालातून तेच दिसून आले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. आपण अन्यायाविरोधात उभे ठाकलेलो आहोत. आता निवडणुकीपूर्वी दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

राहुल नार्वेकर यांच्याकडून लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे. नार्वेकर सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाही, हे या निकालातून दिसून आले आहे. याप्रकरणी लवाद म्हणून नार्वेकर यांना बसवले होते. त्यांची वागणूक ही स्पष्टपणे दर्शवणारी होती, की त्यांची मिलीभगत, संगनमत झाले आहे. लोकशाहीचा खून करण्यासाठी त्यांचे कटकारस्थान सुरू आहे का, अशी शंका येत होती. निकालाच्या आधी त्यांनी आरोपीची दोनदा भेट घेतली होती. त्यामुळे हा निकाल अपेक्षित होता, असे ते म्हणाले.

आजच्या निकालाने यांनी लोकशाहीची हत्या केली. पक्षांतर बंदी कायदा मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसे करावे, पक्षआंतराचा राजमार्ग कसा असायला हवा, हे त्यांनी आज दाखवून दिले आहे. त्यांनी स्वतः दोन-तीन पक्ष बदलले आहेत. त्यामुळे भावी वाटचालीतील अडथळा त्यांनी दूर केला असेल. मात्र, देशातील सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सर्वोच्च असतात. पण नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय धाब्यावर बसवले आणि आमच्यामागे महाशक्ती आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशही जुमानत नाही, हे त्यांच्या निर्णयातून दिसून आले आहे. न्यायालयाने त्यांना दिलेली जबाबदारी समजली नसावी आणि ते वेगळ्याच बाबी तपासत बसले, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी त्यांनी कोणालाही अपात्र ठरवलेले नाही. मूळ प्रकरण हे अपात्रतेचे होते. जर ते आमची घटना ग्राह्य धरत नसतील तर आम्हाला अपात्र का नाही केले, असा सवाल त्यांनी केला. त्याही पुढे जात शिवसेना कोणाची याबाबत त्यांनी निकाल दिला आहे. शिवसेना कोणाची हे राज्यातील लहान मुलेही सांगू शकतील, एवढे स्पष्ट आहे. निवडणूक आयोगाचा याबाबतचा निर्णय अयोग्य आहे. आम्ही त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या निर्णयावरच त्यांनी निकाल दिला आहे. ज्याचा पायाच डळमळीत आहे, त्यावर निर्णय देणे, हा निर्लज्जपणाचा कळस आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश न जुमानता त्यांनी निर्णय दिला आहे. त्यामुळे अवमान याचिका दाखल करता येते का ,याचा विचार करणार आहोत. मात्र, कदाचित अशी याचिक दाखल करता येत नसावी, याचा त्यांनी गैरफायदा घेतला आहे. देशातील लोकशाही यांनी पायदळी तुडवली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्त्व शिल्लक राहणार आहे का, हे आता न्यायालयानेच ठरवायचे आहे. या प्रकरणी आम्हाला अवमान याचिका दाखल करता येत नसेल तर न्यायालयाने याची स्वतःहून दखल घेत स्यू मोटो दाखल करून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाने आमचा गटनेता मानला होता, आमचा व्हिप मानला होता. सर्वोच्च न्यायालयाने या बाबी न बघता केल्या होत्या, असे त्यांचे म्हणणे आहे काय, असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे 2018 मधील पक्षातील पदे आणि घटना त्यांना मान्य नसतील तर गद्दार कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. पक्ष प्रमुख पदाबाबत ते जे बोलले आहे, ते त्यांच्या चौकटीत न बसणारे वक्तव्य आहे. नेता हा पक्षाला दिशा देण्याचे काम करतो.

सर्वोच्च न्यायालयाने त्यांना गटनेता कोण आहे ते स्पष्ट केले होते. त्यानंतरची घटना बघण्याचा निर्णय दिला होता. मात्र, न्यायालयाचे निर्देश न जुमानता ते वेगळ्यचा मुद्द्यात घुसले आणि वेळकाढूपणा केला. वेळकाढूपणा करणे हा त्यांचा हेतू स्पष्ट होता. हाच निर्णय ते पहिल्या दिवशीही देऊ शकत होते. मात्र, त्यांनी सर्व नाटक केले. त्यानंतर 10 जानेवारीपर्यंतचा वेळ मारून नेला. आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. त्यात काही वेळ जाणार आहे. न्यायालयाने हे सर्व बघितले आहे. त्यांनी याची दखल घेत निवडणुकीपूर्वी दूध का दूध पाणी का पानी झाले पाहिजे.

जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत शिवसेना संपवण्याचा त्यांचा डाव होता. पण शिवसेना संपत नाही, हे त्यांना समजले आहे. मिंध्याची शिवसेना हे राज्यातील आणि देशातील जनता मानणार नाही. शिंदेची शिवसेना होऊच शकत नाही, शिंदे आणि शिवसेना हे नाते तुटलेले आहे. हा निकाल एक सेटिंग्ज होते. सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर जात कायद्याचा अनर्थ करत त्यांनी निकाल दिला आहे. हा सर्वोच्च न्यायालयात आणि जनतेच्या न्यायालयात टिकणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.