तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची सोलापुरात चौकशी, तक्रारदार महिलेसमोर दोन तास झाडाझडती

तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची घरकुल पोलीस ठाण्यात जवळपास दोन तास चौकशी करण्यात आली. किरण लोहार यांनी विविध आमिषे दाखवून लाखो रुपये उकळल्याचा आरोप जाकेरा फिरदोस शाहीद खान या महिलेने केला आहे. या पार्श्वभूमीवर घरकुल पोलिसांनी चौकशी केली.

पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख यांनी तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार, जि. प. शिक्षण विभागात कार्यरत असलेले शिपाई संजय सातपुते, राकेश गायकवाड तसेच विद्यमान शिक्षणाधिकारी संजय जाकीर यांना घरकुल पोलीस चौकीत चौकशीसाठी बोलाकून घेतले होते. तक्रारदार महिलेच्या समोर पोलिसांनी तपास केला आहे.

सोलापूरमधील एका खासगी शाळेला वर्गकाढीची मान्यता देण्यासाठी 25 हजार रुपये घेताना 31 ऑक्टोबर 2022 रोजी लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना रंगेहाथ पकडले होते. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी 22 डिसेंबर 2022 रोजी जाकिरा फिरदोस खान, शाहीद उल्लू खान या दोघांना बोगस शिक्षणाधिकारी म्हणून शाळा तपासणी करत असताना पकडले होते. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. याच महिलेने 28 डिसेंबर 2022 रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यात येऊन गोंधळ केला होता. तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी मला शिक्षण खात्याचे ओळखपत्र बनवून दिले. शिक्षण खात्यात भरपूर नोकऱ्या आहेत, उमेदवार आणा, असे सांगत पैसे घेण्यास सांगितले.

वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घरकुल पोलीस चौकीत शनिकारी सायंकाळी तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी उपस्थिती लावली होती. जाकेरा खान ही संशयित महिलादेखील हजर होती. पोलिसांनी समोरासमोर विचारपूस करण्यास सुरुवात केली. ही विचारपूस जवळपास दोन तास सुरू होती. यामध्ये संबंधित महिलेने किरण लोहार यांच्यावर गंभीर आरोप केले. महिलेचे जबाब नोंदवून व किरण लोहार यांचा जबाब नोंदवून पोलीस प्रशासन चार्जशीट कोर्टात दाखल करणार आहेत.

विद्यमान शिक्षणाधिकारी संजय जाकीर यांनादेखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. शिक्षण खात्यातील दोन शिपाई संजय सातपुते व राकेश गायकवाड हेदेखील चौकीत उपस्थित होते. या दोन्ही शिपायांसोबत संबंधित महिलेचे मोबाईल कॉल रिकॉर्डिंगदेखील आहेत. ते रिकॉर्डिंग पोलिसांनी हस्तगत केले आहे. लवकरच या सर्व बाबींचा तपास होणार आहे.