भुजबळांचा राजीनामा घेऊन चौकशी करा; मनोज जरांगे पाटील यांची मागणी

छगन भुजबळ यांना डोकं राहिलेलं नाही; ते कामातून गेले आहेत. त्यामुळे गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांच्या पदांचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी केली. जालना जिल्ह्यात पिस्तूल आल्याचे आणि बीडमध्ये जाळपोळीच्या घटनांना रंग दिल्याचे भुजबळ यांना कसे कळले? असा सवाल उपस्थित करून त्यांची चौकशी न केल्यास सरकारला पुढे खूप जड जाईल, असा इशाराही जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे पत्रपरिषदेत दिला.

जालन्यात 200 गावठी पिस्तूल घेण्यासाठी राजकीय पुढार्‍यांकडून रसद पुरवली जात असल्याची टीका अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेत केली होती. यावर जरांगे पाटील म्हणाले की, गोदापट्ट्यातील जालना, बीड जिल्ह्यातील दौरे करता नाही आले म्हणून राहिलेले सगळी गावे एकत्र करून बीडमधील गेवराई आणि जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव येथे राहिलेल्या सर्व गावांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पिस्तूल मुद्यावर बोलताना पिस्तूल आले हे एकट्याला कसे माहीत? तुमच्या लोकांना हे पिस्तूल देऊन आमच्या आंदोलनात सहभागी करून कायदा सुव्यवस्था बिघडवून आमच्या आंदोलनाची बदनामी, बिघडण्याचे काम तर करत नाही ? असा सवाल करीत त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भुजबळांची चौकशी करण्याचे आवाहन केले.

बीडमध्ये मराठा आंदोलनदरम्यान लोक जय शिवराय, जय जिजाऊ घोषणा देऊन घरे पेटवली या भुजबळांच्या वक्तव्यावरही जरांगे पाटील यांनी भुजबळ बधीर झाला आहे, दुसरे काही काम नाही, तेवढेच काम राहिले. छगन भुजबळ मंत्रिमंडळ व राज्याला लागलेला कलंक असून त्यांना डोकं राहिलेलं नाही. ते कामातून गेले. ते गरीब मराठाबांधव, गरीब ओबीसी बांधवांचा रोष पत्करत असल्याचे सांगितले.

तीन कोटी की तीन लाख समाज ते दिसेलच
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळू देणार नाही या भुजबळांच्या वक्तव्याचाही जरांगे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, तू वेडा आहे का, तुला काही कळतं का, आरक्षण ओबीसीतून घेतले, मराठा ओबीसीत गेला आहे. मुंबई जवळ आल्यावर बघायला ये तीन कोटी मराठा समाज का तीन लाख समाज ते दिसेल. तुम्ही डाव खेळता, आम्हाला खेळता येत नाही का? मुंबई जवळ आली की समजेल मराठ्यांचा वेढा कसा पडतो.

कांदा, पैसे खाऊन जेलमध्ये बसलो नाही
संदीप क्षीरसागर भेटायला का आले, हा प्रश्न त्यांनाच विचार. क्षीरसागर कुटुंब तुझ्यासारखे बेउपकारी नाही. अनेक पिढ्यांपासून लोक त्यांच्या मागे आहेत. ते उपकार विसरले नसल्याचे जरांगे म्हणाले. रात्रंदिवस मराठा समाजाच्या दारात फिरतो, शरीराला त्रास होतो म्हणून रात्रभर सलाईन घेतो. दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा समाजासाठी फिरतो, तुझ्यासारखे लोकांचा वापर करून कांदा, पैसे खाऊन जेलमध्ये जाऊन बसलो नाही, असा टोला त्यांनी लगावला.

मुंबईची तयारी पूर्ण
एसीत बसून काय कळणार गरिबांच्या व्यथा, उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधात बोलायला माझ्यात एवढी मस्ती कुठून आली, आरक्षण मिळाल्यावर कळेल, मस्ती कुठून आली ते. सरकारशी चर्चा करून कंटाळा आला, आता मुंबईला निघायचे आहे. त्याची तयारी पूर्ण झाल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

मुंबईला जाण्यासाठी तयार रहा
गेवराई : मराठ्यांना आता आरक्षणापासून कोणीच रोखू शकत नाही. मराठ्यांनी आरक्षणाची 80 टक्के लढाई जिंकली आहे. नोंदी मिळाल्यात, आता फक्त सरसकट आरक्षणासाठीची लढाई सुरू आहे. त्यासाठी मराठा बांधवांनो 20 जानेवारीला शांततेत मुंबईला जायचे आहे. ताकदीने तयार रहा. लेकरांच्या डोक्यावर गुलाल टाकण्याची हीच खरी वेळ आहे. आपल्या धसक्याने समिती पुन्हा कामाला लागली आहे. मराठवाड्यातील एकही जिल्हा आरक्षणापासून वंचित राहणार नाही. मी मॅनेज होत नाही, कारण मी माझ्या जातीशी गद्दारी करू शकत नाही. तुम्ही फक्त एकजूट ठेवा. मराठा आरक्षणासाठीच्या लढाईसाठी आलेल्या संधीचे सोने करा, आपले गाव आणि परिसर पिंजून काढत सर्वांना मुंबईला येण्यासाठी कळवा, असे आवाहन जरांगे यांनी सायंकाळी गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील जाहीर सभेत केले.

यावेळी ठिकठिकाणी माता-भगिनींनी त्यांचे औक्षण करून जेसीबीतून फुलांची उधळण करत ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी सिरसदेवी परिसरातील सकल मराठा बांधव तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी जरांगे पाटलांच्या हस्ते बेलगुडवाडी येथील मराठा बांधवास कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले.