चेन्नई-बंगळुरू लढतीने आयपीएलचा धमाका, महेंद्रसिंग धोनी अन् विराट कोहली लढतीचे मुख्य आकर्षण

लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेल्या आणि क्रिकेटविश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या आयपीएलने यंदा झोकात सतराव्या वर्षात पदार्पण केलेय. या बहुचर्चित लीगच्या तुफान फटकेबाजीला आजपासून सुरुवात होतेय. तब्बल पाचवेळा आयपीएलचा करंडक जिंकणारा गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज आणि पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नईच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर उद्घाटनाची लढत रंगणार आहे.

विक्रमी सहाव्यांदा आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरण्याच्या इराद्याने ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ सज्ज झालाय. दुसरीकडे महिला प्रीमियर लीगमध्ये यंदा बंगळुरूने विजेतेपद पटकाविल्यामुळे त्यांच्या पुरुष संघालाही आता जेतेपदाचे वेध लागले आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना बुधवारी एक तुल्यबळ लढत बघायला मिळेल, एवढे नक्की. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने गतवर्षी पाचव्यांदा आयपीएलच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरून मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली होती, मात्र यावेळी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ 42 वर्षीय धोनीच्या छत्रछायेखाली विजेतेपद राखण्यासाठी सज्ज झालाय.

चेन्नई संघातील डेवॉन कॉन्वे हा अंगठय़ाच्या दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या जागी रचिन रवींद्रची निवड करण्यात आली आहे. तो कर्णधार ऋतुराजच्या साथीने डावाची सुरुवात करू शकतो. डॅरिल मिचेल, अनुभवी अजिंक्य रहाणे यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. याचबरोबर शिवम दुबे, मोईन अली आणि रवींद्र जाडेजा हे अष्टपैलू खेळाडू चेन्नई संघाची खरी ताकद आहेत. या त्रिमूर्तींमध्ये एकहाती सामना फिरवण्याची ताकद असल्यामुळे प्रतिस्पर्धी संघांना गाफील राहून चालणार नाही. शिवाय दीपक चहर, शार्दुल ठाकूर, मिचेल सॅण्टनर व महेश तिक्षणा असे प्रतिभावान गोलंदाजही चेन्नईच्या ताफ्यात आहेत.

दुसरीकडे बंगळुरूने अद्याप चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर हरविलेले नाहीये. दोन महिन्यांनंतर ब्रेकनंतर मैदानावर परतणारा विराट कोहली व कर्णधार फाफ डू प्लेसिस यांच्यावर मदार असेल. कॅमेरून ग्रीन व ग्लेन मॅक्सवेल हे धडाकेबाज फलंदाजही बंगळुरूच्या संघात असतील. मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, अल्जारी जोसेफ, आकाश दीप व रिसे टॉपली असा वेगवान गोलंदाजांचा ताफा या संघाची ताकद असेल. मॅक्सवेलसह हिमांशू वर्मा, कर्ण धर्मा व मयंक डागर अशा फिरकीपटूंनाही संघात स्थान देण्यात आले आहे.

उद्घाटन सोहळय़ात स्टार कलाकारांचा जलवा

आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा शंखनाद होण्यापूर्वी स्टार कलाकारांच्या अदाकारीने उद्घाटन सोहळा रंगणार आहे. सिने अभिनेता अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, गायक सोनू निगम आणि संगीतकार ए. आर. रहमान हे या कार्यक्रमात आपला जलवा दाखविणार आहेत. उद्घाटन सोहळय़ाचा कार्यक्रम चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सायंकाळी 6.30 वाजता सुरू होईल. या कार्यक्रमामुळे आयपीएलचा पहिला सामना रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. इतर वेळी रात्रीचे सर्व सामने 7.30 वाजता सुरू होतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

बारा भाषांमध्ये आयपीएलचे समालोचन

गतवर्षीप्रमाणे यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचेही तब्बल 12 भाषांमध्ये समालोचन होणार आहे. गतवर्षी पंजाबी, उडिया व भोजपुरी भाषेतील आयपीएलचे समालोचन लक्षवेधी ठरले होते. यावेळी समालोचनात हरयाणवी भाषेचे पदार्पण होणार आहे. याचबरोबर ‘जिओ सिनेमा’वर 12 भाषांमध्ये सामन्यांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. ‘स्टार टीव्ही’ व ‘जिओ सिनेमा’वर इंग्रजी, हिंदी, मराठी, तमीळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, बंगाली, मल्ल्याळम आदी भाषांत आयपीएलचे धावते समालोचन होणार आहे. केदार जाधव, धवल कुलकर्णी, किरण मोरे, सिद्धेश लाड, प्रसन्ना संत, चैतन्य संत व कुणाल देठे यांचे समालोचन मराठीमध्ये ऐकायला मिळेल.

संभाव्य उभय संघ

चेन्नई – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जाडेजा, शिवम दुबे, डॅरिल मिशेल, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, महेश थिक्षणा.

बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मयंक डागर, रजत पाटीदार, पॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, अल्जारी जोसेफ, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)