IPL 2024 : ज्याला घेण्यासाठी टाळाटाळ केली त्या खेळाडूविषयी प्रीती झिंटाची खास पोस्ट

आयपीएलच्या यंदाच्या पर्वामध्ये अनेक उलटफेर पाहायला मिळत आहेत. हिंदुस्थानच्या युवा खेळाडूंनी सर्वांना प्रभावित केले आहे. रियान पराग, प्रभासिमरन, अभिषेक शर्मा, मयांक यादव इ. या नावांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये भर पडण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या सतराव्या सामन्यात पंजाब किंग्जने विजय संपादित केला. या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली ती शशांक सिंगने. शशांक सिंग या युवा खेळाडूच्या खेळीमुळे प्रभावित होऊन पंजाबची संघ मालक प्रीती झिंटाने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आयपीएलला सुरू होण्यापूर्वीच शशांक सिंगचे नाव चर्चेमध्ये आले होते. कारण आयपीएलच्या लिलावात पंजाबच्या फ्रँचायझीने चुकीच्या शशांक सिंगला खरेदी केले असे बोलले जात होते. त्यामुळे त्याचे नाव प्रसारमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरले होते. पण सर्वांची बोलती बंद करत गुजरातविरुद्धा अशक्य वाटणारा विजय शशांक सिंगने पंजाबला मिळवून दिला. त्यामुळे पंजाबची संघ मालक प्रीती झिंटाने त्याच्यासाठी एक्सपोस्टवर  एक पोस्ट शेअर केली आहे. “आयपीएलच्या लिलावात शशांक सिंगबद्दल ज्या काही गोष्टी घडल्या त्या बद्दल भाष्य करण्यासाठी आजचा दिवस योग्य वाटतो. अशा परिस्थितीत आत्मविश्वास कमी होणे साहजिक आहे. अनेकजण दबावाखाली गेले असते. पण शशांक त्याला अपवाद ठरला. तो इतरांसारखा खचणारा नसून तो खरोखरच खास आहे. त्याच्यामध्ये असणाऱ्या सकारात्मक वृत्तीमुळे तो खूप खास आहे. त्याने सर्व टीका टिप्पण्या आणि विनोद खेळीमेळीने घेतले. त्याने हिमतीने पुढे जात तो कोणत्या परिस्थितीतून आला आहे ते दाखवून दिले, त्यासाठी मी त्याचे कौतुक करते, ” असे म्हणत प्रीती झिंटाने शशांकच्या सकारात्मक वृत्तीचे विशेष कौतुक केले.

“मला आशा आहे की जेव्हा आयुष्य एक वेगळे वळण घेते आणि सर्वकाही मनासारखे होत नाही तेव्हा तुमच्या सर्वांसाठी शशांक एक उदाहरण असेल. कारण लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही स्वत:बद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे शशांकसारखा स्वत:वर विश्वास ठेवा आणि मला खात्री आहे की तो जीवनाच्या प्रत्येक खेळीत सामनावीर होईल,” असे म्हणत प्रीती झिंटाने शशांकला त्याच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.