IPL 2024 : राजस्थानही आऊट होऊ शकतो… जर-तरच्या समीकरणावर रंगणार आयपीएलचा खेळ

9 सामन्यांपैकी 8 विजय नोंदविणारा राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये धडक मारणारा पहिला संघ ठरेल, याबाबत कुणाला शंका नाही. मात्र हा संघ साखळीतही बाद होऊ शकतो. ते जर पुढील सर्व सामने हरले तर अशी स्थिती निर्माण होऊ शकते. पण या घडीला असे म्हणणे चुकीचे ठरेल.

राजस्थानसाठी प्ले ऑफचा मार्ग अत्यंत सोपा आहे. पण तळाला असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाशिवाय इतर 8 संघही 16 गुणांपर्यंत पोहचू शकतात. जर-तरच्या समिकरणात राजस्थानने उर्वरित पाचही साखळी सामने गमावले, अन् इतर 8 संघांपैकी 4 संघांनी त्यांच्यापेक्षा अधिक गुण मिळवले, तर राजस्थानचा संघ अद्यापही प्ले ऑफच्या शर्यतीतून आऊट होऊ शकतो. पण हे सारे समीकरण जर-तरचे आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट निश्चित नसते. त्यामुळे या शक्यतेला आपण या घडीला नाकारू शकत नाही.

राजस्थान रॉयल्सने यंदाच्या आयपीएल हंगामात 9पैकी 8 सामने जिंकले आहेत. या संघाते आतापर्यंत केवळ एकदाच पराभवाचे तोंड बघितले आहे. खरंतर 16 गुणांसह बर्याचदा संघ प्लेऑफला पात्र ठरल्याचे दिसून येते. मात्र असे असतानाही अद्याप राजस्थान रॉयल्स अधिकृतरित्या प्ले ऑफसाठी पात्र का ठरले नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. सध्या गुणतालिकेत आठव्या आणि नवव्या क्रमांकावर असलेल्या पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघाचेही 5 सामने बाकी असल्याने ते जास्तीत जास्त 16 गुणांपर्यंत पोहचू शकतात. हे दोन संघ अजून एक जरी सामना हरले, तरी त्यांना राजस्थानच्या 16 गुणांपर्यंत पोहोचता येणार नाही.

त्याचप्रमाणे दिल्लीआणि गुजरात हे दोन संघ त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले, तरी जास्तीत जास्त 18 गुणांपर्यंत पोहचू शकतात, त्याचमुळे त्यांनी जर आणखी दोन पराभव पत्करले, तर मग राजस्थानचा प्ले ऑफचा मार्ग आणखी सोपा होईल. याशिवाय लखनौ आणि चेन्नई या संघांना जास्तीत जास्त 20 गुणांपर्यंत पोहचला येणार आहे. कोलकाता आणि हैदराबाद संघालाही 20 ते 22 गुण मिळवता येणार आहेत. त्यामुळे एकूण विचार करता अद्यापतरी राजस्थानला अधिकृतरित्या प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी आणखी एक किंवा दोन विजयांची, तरी गरज असणार आहे.