बंगळुरूला विजयाचा जॅक; गुजरात टायटन्सला नमवत तिसऱया विजयाची नोंद

आयपीएलमध्ये पराभवाचा दुर्दैवी षटकार ठोकल्यानंतर शुद्धीत आलेल्या बंगळुरूचे आव्हान संपल्यातच जमा आहे. मात्र आज त्यांना विल जॅक्सच्या शतकी खेळीने विजयाचा ‘जॅक’ लावला. गुजरातचे 201 धावांचे आव्हान विल जॅक्स आणि विराट कोहलीच्या 166 धावांच्या अभेद्य भागीने 16 व्या षटकांतच गाठत बंगळुरूला आयपीएलमधील मोठा आणि स्फूर्तिदायक विजय मिळवून दिला.

आयपीएलमध्ये गेला महिनाभर निराशाजनक खेळ करणाऱया बंगळुरूने आपल्या पराभवाचा मास संपवताना तीन दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात धावांचा पाऊस पाडणार्या हैदराबादला नमवण्याचा पराक्रम करून दाखवला होता तर आज गुजरात टायटन्सची त्यांच्या घरच्या मैदानात धुळधाण उडवली. गुजरातच्या 201 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूने आपल्या चौथ्या षटकातच कर्णधार फाफ डय़ु प्लेसिसचा विकेट गमावला. कर्णधाराने आपल्या 24 धावांच्या खेळीत 3 षटकार आणि 1 षटकार ठोकला होता. तो बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्रे विराट कोहलीने आपल्या हाती घेत विल जॅक्सच्या साथीने जोरदार खेळ केला.

सुदर्शन-शाहरुखमुळे गुजरात 200
गुजरातच्या डावात शुबमन गिलला आपली फलंदाजी दाखवता आली नाही. टी-20 वर्ल्ड कपच्या दबावामुळे तो 19 चेंडूंत अवघ्या 16 धावा करून बाद झाला. मात्र साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांनी वैयक्तिक अर्धशतके साजरी करत गुजरातला 200 धावांपर्यंत नेले. दोघांनी तिसऱया विकेटसाठी 86 धावांची भागी रचली. शाहरुखने 5 षटकार खेचत 30 चेंडूंत 58 धावा केल्या. त्यानंतर साईने डेव्हिड मिलरच्या साथीने 69 धावांची भर घातली. साईने नाबाद 84 धावा केल्या, तर मिलरने 26 धावांची खेळी केली.

कोहलीचा आणखी एक विक्रम
विराट कोहलीने यंदाच्या मोसमात आपल्या धावांचे सातत्य कायम राखताना 70 धावांची नाबाद खेळी केली आणि 500 धावांचा टप्पाही गाठला. याचबरोबर त्याने एका आयपीएल मोसमात सातव्यांदा 500 धावांचा टप्पा गाठत डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाची बरोबरी साधली. वार्नरनेही आयपीएलच्या सात मोसमात 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच के. एल. राहुल आणि शिखर धवन या दोघांनी हा पराक्रम आतापर्यंत चारवेळा केला आहे.

जॅक्सच्या 14 चेंडूंत 64 धावा
सामना एकदम शांत सुरू होता. कोहली एका बाजूने जबरदस्त किल्ला लढवत होता. त्यांनी 13 षटकांत 134 धावा केल्या होत्या, पण 14 व्या षटकांत सामन्याचा सारा नूरच पालटला. अत्यंत सामान्य फलंदाजी करणाऱया जॅक्सने 27 चेंडूंत 37 धावा केल्या होत्या, पण त्यानंतर त्याने अंगात वादळ संचारल्यासारखी फलंदाजी करताना मोहित शर्मा आणि राशीद खानच्या चेंडूलाच पह्डून काढले. त्याने आपल्या पुढील 14 चेंडूंत 8 षटकार आणि 3 चौकारांची आतषबाजी करत 64 धावा चोपून काढल्या. विशेष म्हणजे 31 व्या चेंडूंवर अर्धशतक साजरे करणाऱया जॅक्सने 41 व्या चेंडूवर आपले वेगवान शतक ठोकले. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 50 ते 100 धावांचा टप्पा अवघ्या दहा धावांत गाठणारा जॅक्स हा पहिलाच फलंदाज आहे. त्याने डावाच्या 15 व्या षटकात मोहित शर्माला 4, 6, 7 नो, 2, 6, 4, 0 अशा 28 धावा चोपून काढल्या तर राशीद खानच्या फिरकीवरही 6, 6, 4, 6, 6 अशा 28 धावा काढत आपले 41 व्या चेंडूंवर शतक साकारले. त्याच्या या झंझावातामुळे बंगळुरूने 24 चेंडू राखून मोठा विजय नोंदविला. जॅक्सने आपल्या शतकी खेळीत 10 षटकार आणि 5 चौकार ठोकले, तर कोहलीने 44 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकार खेचत नाबाद 70 धावा केल्या.