इराणचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक, सुन्नी दहशतवाद्यांचे बलुचिस्तानातले तळ उद्ध्वस्त

इराणच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातून इराणविरोधी घातपाती कारवाया करणाऱया सुन्नी दहशतवाद्यांचे दोन अड्डे शिया पंथीय इराणने मंगळवारी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांत नष्ट केले. पाकिस्तानला कोणतीही पूर्वकल्पना न देता हा सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला.

पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडणाऱया या इराणी कारवाईमुळे हादरलेल्या पाकिस्तानने, हवाई हद्दीचा भंग केल्याबद्दल इराणचा निषेध केला आहे. इराणच्या राजदूतांना पाकिस्तानात परत येऊ नका असे कळवण्यात आले असून इराणमधूनही आपले राजदूत पाकिस्तानने माघारी बोलावले आहेत. राजनैतिक स्तरावरील सर्व वाटाघाटी, परस्पर भेटीगाठी, दौरे थांबवण्याचा निर्णयही पाकिस्तानने जाहीर केला असला तरी इराणने, दोन दहशतवादी तळ आम्ही नष्ट केले, यापलिकडे एका शब्दानेही पाकिस्तानच्या निषेधपर कृतींची दखल घेतलेली नाही. या हल्ल्यांत दोन लहान मुले मारली गेली असून तीन मुली जखमी झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

इराणला लागून असलेल्या सुमारे एक हजार किमी सीमाभागात दहशतवादी कारवाया करणारा जैश-उल-अदल हा सर्वात सक्रीय आणि प्रभावी असा सुन्नी दहशतवाद्यांचा गट आहे. गेल्या महिन्यात इराणच्या हद्दीतील सिस्तान पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यात किमान 11 इराणी पोलीस अधिकारी ठार झाले होते.

पाकिस्तानमध्ये राजनैतिक गोंधळ

इराणशी मैत्री राखू पाहाणाऱया पाकिस्तानचा या हल्ल्ल्यांमुळे गोंधळ उडाला आहे. दावोसच्या आर्थिक परिषदेत पाकिस्तानचे अंतरिम पंतप्रधान कक्कर आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट होत असतानाच हा हल्ला झाल्यामुळे पाकिस्तानचे नाक कापले गेले आहे. दोन्ही देशांमध्ये संवादासाठी अनेक अधिकृत संपर्क यंत्रणा असताना इराणने पाकिस्तानला गाफील ठेवून हा हल्ला करावा याबद्दल विरोधी पक्षांनीही पाकिस्तान सरकारला धारेवर धरले आहे.

नेमके काय घडले…

– इराणने बलुचिस्तान प्रांतातील कुहे सब्ज भागात क्षेपणास्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला चढवून जैश-उल-अदल या सुन्नी पंथीय दहशतवादी गटाचे दोन महत्त्वाचे तळ उद्ध्वस्त केले.
– इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) हा हल्ला केला. हरा परबत भागातील हे दोन अड्डे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याचा संयुक्त वापर करत संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले, असे इराणच्या तस्नीम वृत्त संस्थेने म्हटले आहे.
– जैशकडून पाकिस्तानी भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी उपयोग होत असल्याबद्दल इराणने अनेकदा पाकिस्तानला इशारे दिले होते.