‘चांद्रयान-3’च्या काऊंटडाऊनचा आवाज हरपला, इस्त्रोच्या महिला वैज्ञानिकाचे निधन

एकीकडे सगळा देश ‘चांद्रयान 3’ ही मोहीम यशस्वी झाल्याने आणि ‘आदित्य एल-1’ही सूर्याकडे यशस्वीपणे झेपावल्याचा आनंद साजरा करत असताना एक दु:खद बातमी समोर आली आहे. चांद्रयान लॉंचिंगला काऊंटडाऊन देणाऱ्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचे 64 वर्षी निधन झाले आहे. कार्डियक अरेस्टने त्यांचा मृत्यू झाला.

एन.वलारमथी यांचे ‘चांद्रयान 3’ हे शेवटचे मिशन ठरले. 14 जुलैला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून ‘चांद्रयान 3’ चंद्राच्या दिशेने झेपावले. यावेळी काऊंटडाऊन देणारा आवाज वलारमथी यांचा होता. तामिळनाडूच्या अलियायुरहून आलेल्या वलारमथी यांनी शनिवारी चेन्नईमध्ये अखेरचा श्वास घेतला.

इस्त्रोचे माजी संचालक पी.व्ही.वेंकटकृष्णन यांनी ट्विट करत वलारमथी यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलेय की, श्रीहरिकोट्टामध्ये इस्त्रोच्या भविष्यातील मोहिमांच्या काऊंटडाऊनसाठी वलारमथी मॅडमचा आवाज ऐकू येणार नाही. ‘चांद्रयान-3’ ला त्यांनी अखेरचा आवाज दिला. अनपेक्षित निधन. फार वाईट वाटते. प्रणाम.

सोशल मीडियावर शास्त्रज्ञ वलारमथी यांना युजर्स त्यांच्या इस्त्रोच्या योगदानाबाबत सलाम करत आहे. प्रत्येकजण त्यांच्या आवाजाची प्रशंसा करत आहेत आणि कशाप्रकारे त्यांचे नाते सर्वांशी जुळले याबाबत लिहीत आहेत.