जाफराबाद पोलिसांनी चोरीच्या 11 दुचाकी, 4 मोबाईल केले जप्त; पाच आरोपी गजाआड

जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीतील पाच संशयितांना जालना जिल्ह्यातील जाफराबाद पोलिसांनी गजाआड केले आहे. संशयितांकडून चोरीच्या 11 दुचाकी, चार मोबाईल, असा एकूण 8 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही गुरुवारी करण्यात आली.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. जाफराबाद तालुक्यातील येवता येथील दादाराव भिकाजी दाभाडे यांची दुचाकी 19 जुलै रोजी चोरीस गेली होती. दाभाडे यांनी याबाबत जाफराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द तक्रार दाखल केली होती. संशयित दुचाकी चोरांचा शोध घेत असताना, दत्तात्रय संजय जाधव (23, रा.बोरगाव फदाट,ता.जाफराबाद जि. जालना) याने दुचाकी चोरल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे व उपनिरीक्षक प्रल्हाद मदन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित दत्तात्रय जाधव यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने दाभाडे यांची दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता साथीदार जावेद हबीब मुलतानी (29, रा.ग़ारखेडा,जाफराबाद), सोमनाथ जगन्नाथ खंदाडे (23), वैभव ज्ञानेश्वर भोपळे (23) विष्णू गुलाबराव फदाट (21, सर्व.रा.बोरगाव ता. जाफराबाद) यांच्या मदतीने जालना व छत्रपती संभाजीनगर शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दत्तात्रय जाधव याच्या साथीदारांनाही अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या 11 दुचाकी व 4 मोबाईल जप्त केले आहेत. या कारवाईत छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांचे पाच गुन्हे उघडकीस आले असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपवभिागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे, उपनिरीक्षक प्रल्हाद मदन, कर्मचारी गणेश पायघन, प्रभाकर डोईफोडे यांनी ही कारवाई केली.