बुलेट ट्रेन! पालघरजवळ धावत्या एक्प्रेसमध्ये अंदाधुंद गोळीबार!! सहाय्यक उपनिरीक्षकासह 4 ठार

जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस आज ‘बुलेट’ ट्रेन ठरली. गाडीत तैनात असलेल्या चेतन सिंह या आरपीएफ जवानाने गाडीच्या बी- 5 डब्यात अंदाधुंद गोळीबार केला. त्यात या जवानाचे वरिष्ठ असलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक टीकाराम मीना व अन्य तीन प्रवासी अशा चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या काही मिनिटांत चेतन याने तब्बल 12 गोळय़ा झाडल्या. त्यामुळे डब्यात रक्ताचा सडा पडला होता. पालघर स्टेशनजवळ पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, मीरारोडजवळ गाडीतून उडी घेऊन पसार होण्याचा प्रयत्नात असताना चेतनला अटक करण्यात आली.

जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक टीकाराम मीना आणि चेतन हे दोघे सुरक्षा व्यवस्थेसाठी सुरत येथे पहाटे पावणेतीन वाजता चढले होते. चेतनकडे एआरएम गन तर मीना यांच्याकडे पिस्तूल होते. वापी स्थानक गेल्यावर बी-5 या डब्यात चेतन आणि मीना हे गस्तीसाठी फिरत असताना चेतनला कोणाचा तरी फोन आला. फोन संभाषणानंतर चेतन अचानक संतापला. याच संतापाच्या भरात चेतनने अचानक मीना यांच्या छातीवर आणि पोटावर 4 गोळय़ा झाडल्या. मीना तिथेच रक्ताच्या थारोळय़ात कोसळले. त्यानंतर चेतनने क्रौर्याची परिसीमा गाठली. त्यांच्यावर पाय ठेवून दहशत पसरवत चेतन पुढे गेला. याच डब्यात त्याने अब्दुल कादरभाई भानपूरवाला (48, रा. नालासोपारा) या प्रवाशाच्या कानावर आणि हातावर दोन गोळय़ा झाडल्या. त्यानंतर पँट्री कार आणि एस-6 या डब्यातही त्याने गोळीबार केला. त्यामुळे एकच घबराट पसरली. सर्वच प्रवाशांचा जीव टांगणीला लागला.

गोळीबार झालेले डबे सील

गोळीबाराच्या घटनेनंतर सदर गाडी मुंबई सेंट्रल स्थानकाला लागून असलेल्या कारशेडमध्ये आणली आहे. ज्या दोन डब्यांत गोळीबाराची घटना घडली ते दोन्ही डबे रेल्वेने सील केले आहेत. पोलिसांबरोबरच फॉरेन्सिक पथकाने सदर डब्यातील आवश्यक  सर्व पुरावे गोळा केले आहेत. दरम्यान, फयरिंगमध्ये ठार झालेल्यांचे मृतदेह  बोरीवली स्थानकातून उतरवून शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आले. सकाळी 6.21 ते 7.15 वाजेपर्यंत ट्रेन बोरीवली स्थानकात थांबवण्यात आली होती.

मीरा रोड स्थानकाजवळ उडी मारली

बी-5 डब्यात बेछूट गोळीबार केल्यानंतर बाजूच्याच पँट्री कारमध्ये चेतन शिरला. तिथे सदर महमद हुसेन या आणखी एका प्रवाशाच्या पोटात गोळय़ा झाडून त्याने त्याला ठार मारले. तिथून एस 6 या डब्यात येऊन त्याने असगर अब्बास शेख (48, मधुबनी, बिहार) यांच्या छातीत दोन गोळय़ा झाडल्या. एकूण चार बळी घेतल्यावर प्रवाशांनी पकडू नये यासाठी त्याने डब्यातच हवेत दोन गोळय़ा झाडल्या. मीना यांच्या मृतदेहावर पाय ठेवून बडबड करणाऱ्या चेतनचे क्रौर्य पाहून घाबरलेल्या प्रवाशांनी धीर करून गाडीची चेन खेचली. त्यामुळे एक्स्प्रेस मीरा रोड स्थानकाजवळ थांबल्यावर चेतनने उडी मारून पळ काढला. गाडीच्या बाजूने रुळांमधून पळताना रायफल एक्स्प्रेसमध्ये राहिल्याचे लक्षात आल्यावर ती घेण्यासाठी पुन्हा गाडीत चढलेल्या चेतनला आरपीएफच्या दोन जवानांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनादेखील चेतनने गोळय़ा घालू अशी भीती दाखवली. गाडीतून उतरून खारफुटीच्या भागात लपलेल्या चेतनला बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांनी जीव धोक्यात घालून पकडून पोलीस ठाण्यात आणले.

रेल्वे लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे  आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतनवर गुन्हा दाखल केला असला तरी त्याची वक्तव्ये, बडबड आणि प्रवाशांचे व्हिडीओ या सगळय़ाचा तपास करून कारणांची खातरजमा केली जाणार आहे.

बदलीमुळे नाराज चेतनला मानसिक तणाव

चेतन मूळचा उत्तर प्रदेशच्या हाथरसचा असून, 2009 मध्ये रेल्वे सुरक्षा बलात अनुकंपा तत्त्वावर कामावर रुजू  झालेल्या चेतनला नुकतीच एस्कॉर्टची डय़ुटी देण्यात आली होती. गुजरात येथून मुंबईत लोअर परळ वर्कशॉप येथे झालेल्या बदलीमुळे चेतन नाराज होता. त्याची मानसिक स्थिती चांगली नव्हती. त्याने नेमक्या कोणत्या कारणाने गोळीबार केला हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

मीना यांच्या कुटुंबीयांना 40 लाख

मीना हे सवाई माधोपूर येथील असून त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या मुलीचे लग्न झाले असून मुलाचे लग्न काही आठवडय़ांवर आले होते. मुलीने आणि जावयाने त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली. 2025 मध्ये ते निवृत्त होणार होते. रेल्वेच्या तरतुदींनुसार त्यांच्या कुटुंबीयांना 25 लाख भरपाई, 15 लाख रेल्वे कर्मचारी सहाय्य निधी, निवृत्ती वेतनासह ग्रॅच्युईटी, अंत्यविधीसाठी 20 हजार रुपये आणि इतर आर्थिक मदत मिळणार आहे.

चार सदस्यांची एस्कॉर्ट टीम

लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफच्या चार सदस्यांची एस्कॉर्ट टीम तैनात असते. टीकाराम मीना यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यांच्या टीमने रविवारी दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला सुरत स्थानकापर्यत एस्कॉर्ट केले होते. या टीममध्ये चेतनचा समावेश होता. परतीच्या प्रवासात ते जयपूर-मुंबई सेंट्रल एक्सप्रेसला एस्कॉर्ट करण्यासाठी सोमवारी पहाटे पावणेतीन वाजता सुरत स्थानकात जयपूर-मुंबई एक्सप्रेस गाडीत चढले होते.

प्रवासी आणि आरपीएफ जवानांची चौकशी

ज्या डब्यात गोळीबार झाला त्या डब्यातील प्रवासी आणि आरपीएफचे जवान यांच्याकडे पोलीस चौकशी करणार आहेत. त्यांच्या चौकशीनंतर नेमका गोळीबार का आणि कसा झाला हे स्पष्ट होणार आहे. या चौकशीतूनच काही बाबींचा उलगडा होणार आहे.

घरी जाण्यासाठी नेहमी करायचा घाई

आज पहाटे सुरत स्थानकात एक्सप्रेस आल्यावर चेतनने मीना यांना घरी जाऊ देण्यासाठी विनंती केली. चेतन हा डय़ुटी संपल्यावर घरी जाण्यासाठी नेहमी घाई करत असायचा. डय़ुटीदरम्यान चेतनने तिकीट तपासनीस आणि अधिकाऱ्यांना सांगून लवकर घरी जाण्यासाठी विनंती करण्याची ही त्याची चौथी वेळ होती. तब्येत ठीक नसल्याने घरी जायचे आहे, असे चेतनने सांगितल्यावर, मीना यांनी चेतनला काही वेळ विश्रांती घे असे सांगितले होते. चेतनने बी 5 मध्ये विश्रांती घेतल्यावर एक्सप्रेस वापी स्थानकात थांबली. तेव्हा चेतनने आपल्या पाठीत आणि कंबरेत दुखत असल्याचे सांगितले. काही वेळानंतर त्याला फोन आला. परवानगी न मिळाल्याने घरी येऊ शकत नाही असे तो फोनवर कोणाशी तरी बोलल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याने पुन्हा मीना यांना घरी सोडण्यासाठी विनंती केली. विनंतीचे रूपांतर वादात होऊन त्याने अचानक गोळीबार केल्याचे सूत्रांनी सांगितले.

उच्चस्तरीय चौकशी होणार

गोळीबाराची चौकशी करण्यासाठी रेल्वे बोर्डाने आरपीएफच्या अतिरिक्त महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नेमली आहे. ही समिती गोळीबाराची सखोल चौकशी करून आपला अहवाल बोर्डाला सादर करणार आहे.

टीकाराम मीना हे सवाई माधोपूर येथील असून त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या मुलीचे लग्न झाले असून मुलाचे लग्न काही आठवडय़ांवर आले होते. मुलीने आणि जावयाने त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली.