जालना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. टोनगिरेसह दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

प्रातिनिधिक फोटो

जालना जिल्हा हिवताप कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेल्या एका अपंग कर्मचार्‍याची सेवा पुस्तिकेत अपंग अशी नोंद घेण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागून 15 हजार रुपये घेताना आज 18 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जालन्यातील जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. टोनगिरे यांच्यासह अन्य दोन कर्मचार्‍यांना रंगेहाथ पकडल्याने अधिकारी व कर्मचारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जिल्हा हिवताप अधिकारी संतोष तोणगिरे, आरोग्य सेवक अण्णा तारू, आरोग्य सहायक भारत एकनाथ गांगुर्डे असे लाच घेणार्‍या अधिकार्‍यांचे नावे आहेत. तक्रारदार हे आरोग्य सेवक या पदावर कार्यरत असून ते अपंग आहे त्यांच्या अपंग प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तकेमध्ये घेण्यासाठी आरोपी आरोग्य सेवक अण्णा तारू यांनी 20 डिसेंबर 2023 रोजी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपये पंचा समक्ष लाचेची मागणी केली. त्यानंतर 16 जानेवारी 2024 रोजी जिल्हा हिवताप अधिकारी संतोष तोणगिरे व आरोग्य सेवकांनी 20 हजार रुपयाची पंचा समक्ष लाचेची मागणी करून तडजोडी अंती 15 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. आरोग्य सहायक भारत एकनाथ गांगुर्डे यांनी तक्रारदार यांना लाचेची रक्कम जिल्हा हिवताप अधिकारी यांना देण्याकरिता प्रोत्साहित केले.

आज १८ जानेवारी रोजी जिल्हा हिवताप अधिकारी यांनी पंचा समक्ष तडजोडीअंती 15 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर तिघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी लोकसेवक यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे सुरु आहे. ही सापळा कारवाई छत्रपती संभाजीनगरचे एसीबीचे पोलीस निरीक्षक हनुमंत वारे, सहायक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक हरिदास डोळे, सापळा पथक पोहे. साईनाथ तोडकर,दिगंबर पाठक,अशोक नागरगोजे, रामेश्वर ताठे यांनी केली.