Lok Sabha Election 2024 – भाजपात नाराजीनाट्य; जळगाव, रावेर, धुळ्याच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत कलह

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्यापही महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. एकाएका जागेसाठी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये मारामारी सुरू आहे. अशातच भाजपमध्येही उमेदवारीवरून नाराजीनाट्य रंगले आहे. जळगाव, रावेर आणि धुळ्याच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे, तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ यांना रिंगणात उतरवले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. यावरून भाजप कार्यकर्त्यांत प्रचंड असंतोष असल्याचे दिसून येत आहे. रक्षा खडसेंच्या उमेदवारीला विरोध करत शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. भाजपने दुसरा उमेदवार दिल्यास प्रामाणिकपणे काम करण्यास तयार आहेत, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

रावेर लोकसभेच्या खासदार असणाऱ्या रक्षा खडसेंनी कायम आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्या कधीही संपर्कात राहिल्या नाहीत. यामुळे भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांत प्रचंड नाराजी असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे म्हणाले. रक्षा खडसेंना विरोध म्हणून 203 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

एकीकडे रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध होत असताना दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे. येथून स्मिता वाघ यांना पहिल्यांदा उमेदवारी दिल्याने खासदार उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. एकीकडे ते भाजपच्या बैठकीलाही गैरहजर राहिले असून दुसरीकडे उन्मेष पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यास भाजपला मतदान करणार नाही अशी भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

दरम्यान, धुळे जिल्ह्यात भाजपने सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध होत आहे. सुभाष भामरे अड़ीअडचणीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही आणि ते कार्यकर्त्यांना समजूनही घेत नाहीत असा आरोप होत आहे. या तिन्ही मतदारसंघातील नाराजीनाट्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)