मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक…जाणून घ्या कोठे असेल ब्लॉक…

पश्चिम रेल्वे मार्गावर ट्रॅक , सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी रविवारी (28 जानेवारी 2024 रोजी) चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 15.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे.

या ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन मार्गावरील काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंडदरम्यान ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी माटुंगा-मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार वळवण्यात येतील. त्यापुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. डाऊन जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.20 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 3.39 वाजता सुटेल.

अप जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 11.10 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सायंकाळी 4.44 वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावर पनवेल-वाशीदरम्यान ब्लॉक

पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.1 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

डाउन हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 वाजता सुटेल आणि 10.50 वाजता पनवेल येथे पोहोचेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.16 वाजता सुटेल आणि सायंकाळी 4.36 वाजता पनवेल येथे पोहोचेल. अप हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी शेवटची लोकल सकाळी 10.17 वाजता पनवेल येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सकाळी 11.36 वाजता पोहोचेल. ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी 4.10 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सायंकाळी 5.30 वाजता पोहोचेल.

डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी 9.39 वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी 10.31 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल ठाणे येथून सायंकाळी 4.00 वाजता सुटेल आणि पनवेल येथे सायंकाळी 4.52 वाजता पोहोचेल. अप ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी ठाण्याच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 10.41 वाजता सुटेल आणि ठाणे येथे सकाळी 11.33 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर ठाण्याच्या दिशेने जाणारी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी 4.26 वाजता सुटेल आणि ठाणे येथे सायंकाळी 5.20 वाजता पोहोचेल.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागात विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. तसेच ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.