कोरोना रिटर्न! देशात रुग्णसंख्येत वाढ, ‘या’ राज्याने जारी केली नियमावली, मास्क घालण्याचे आवाहन

तीन वर्षांपूर्वी जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने देशात पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत 335 नवीन रुग्ण शोधण्यात आले असून अद्याप पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या जेएन 1 या नवीन व्हेरियंटने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. केरळसह अन्य काही राज्यांमध्येही आरोग्य विभागांनी सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत.

दरम्यान, कर्नाटक या राज्यानेही काही सल्ला वजा सूचना जाही केल्या आहेत. त्यानुसार सर्व ज्येष्ठ नागरिक आणि अन्य दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तीन वर्षांनंतर देशात कोरोनाची चाहूल लागल्याने सध्या वातावरण काहीसं तणावाचं झालं आहे.

सध्या देशात 1700 हून अधिक रुग्ण आहेत. केरळमध्ये एक नवीन व्हेरियंट सापडला असून तो व्हेरियंट यापूर्वी सिंगापूर आणि अमेरिका आणि त्यानंतर चीनमध्ये आढळला होता. या देशांत व्हेरियंटमुळे रुग्णसंख्येत वाढही झालेली पाहायला मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्याने अधिसूचना जारी केली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि अन्य दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या घाबरण्याचं काही कारण नसून फक्त सतर्क राहणं गरजेचं आहे. लवकरच याच्या अधिकृत सूचना जारी करण्यात येतील. केरळच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यात मंगळुरू, चामराजनगर आणि कोडागू यांचा समावेश आहे. सर्व सरकारी रुग्णालयांना तयार राहण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरच तपासण्या वाढवण्यात येतील, असं कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांचं म्हणणं आहे.