करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या 1447 कोटींच्या सुधारित आराखडय़ास मंजुरी, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास प्राधिकरणाअंतर्गत करण्यात आलेल्या 1,448 कोटींच्या आराखडय़ाला जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली. महापालिकेचा आराखडा व प्राधिकरणांतर्गत आराखडा या दोन्हींमध्ये समावेश असलेली कामे व त्याची रक्कम एका आराखडय़ातून वगळून ही मंजुरी देण्यात आली आहे. पुढील आवश्यक मंजुरीसाठी आराखडा शासनाकडे पाठविण्याचे मंजूर करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी शाहूजी सभागृहात जिल्हास्तरीय श्री अंबाबाई परिसर पुनर्विकास आराखडा समितीची बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार जयश्री जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. आर. पाटील, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, अभियंता सुयश पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेने अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी बनविलेल्या 255 कोटींच्या आराखडय़ाअंतर्गत 45 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्या आणि नव्याने बनविण्यात आलेल्या अंबाबाई मंदिर विकास प्राधिकरणअंतर्गत बनविलेल्या आराखडय़ात दर्शन मंडप, पार्किंगसारखी काही कामे आली आहेत. या दोन्ही आराखडय़ांचे प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आले आहेत. त्याची छाननी करताना एकच काम दोन्ही आराखडय़ांत असल्याने एका आराखडय़ातून ते काम व त्याची रक्कम वगळण्यात यावी, अशी सूचना शासनाकडून आली आहे. ही दुरुस्तीची कामे वगळून सुधारित आराखडय़ाला जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.