मीठमुंबरी किनाऱ्याहून 118 ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले समुद्रात झेपावली

मिठमुंबरी समुद्र किनाऱ्याहून ऑलिव्ह रिडले कासवांची 118 पिल्ले समुद्रात झेपावली आहेत. कोकणातील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर कासवांच्या ऑलिव्ह रिडले प्रजातीसह इतर कासवांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कासवांची घरटी आणि अंडी सुरक्षित ठेवण्यात येत आहे. त्याला चांगले यश मिळत आहे. समुद्रकिनाऱ्यावर रविवारी एका घरट्यातून 123 अंड्यापैकी 81 पिल्ले तर दुसऱ्या घरट्यातून 95 पैकी 37 पिल्ले सुखरूपपणे समुद्रात सोडण्यात आली.

यावेळी वनविभागाचे देवगड विभागाचे वनरक्षक निलेश साठे, वनमजूर कृष्णा सुद्रिक,मिठमुंबरी गावाचे सरपंच बाळकृष्ण गांवकर, कांदळवन समितीचे बीच मॅनेजर लक्ष्मण तारी, गाबीत समाज देवगड अध्यक्ष संजय पराडकर प्रियांका तारी आदि उपस्थित होते. कासवाची पिल्ले सुखरूप समुद्रात झेपावल्यावर सर्व मंडळींच्या चेहऱ्यावर समाधान होते. कासव संवर्धनच्या माध्यमातून वनविभाग सावंतवाडी, कांदळवन कक्ष- मालवण व कांदळवन प्रतिष्ठान – मुंबईच्या माध्यमातून आगामी काळात मिठमुंबरी बीचवर कासव महोत्सव आयोजित करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यामुळे पर्यटकांना कासव संवर्धनाचे महत्त्व व येथील संपन्न जैवविविधतेची माहिती मिळेल.