कोपरगाव नगरपालिकेची साडेचार कोटींची करवसुली, 17500 मालमत्ताधारकांकडे पाच कोटींची थकबाकी

दक्षिणकाशी गोदावरी नदीकाठावर ऐतिहासिक कोपरगाव शहर वसले असून, आजपर्यंत वाढत्या विस्तारीकरणामुळे येथे 17 हजार 480 मालमत्ता असून, त्यांच्याकडे नगरपालिकेची 9 कोटी 30 लाख 72 हजार रुपयांची घरपट्टी थकली आहे. पालिका प्रशासनाने त्यापैकी 4 कोटी 59 लाख 80 हजार रुपयांची वसुली केली आहे. वसुलीचे प्रमाण हे 49.40 टक्के आहे, तर 14699 निवासी नळधारकांकडे 5 कोटी 44 लाख 52 हजार रुपयांची नळपट्टी थकली असून, त्यापैकी 2 कोटी 5 लाख 3 हजार रुपये वसूल झाले आहेत.

कोपरगाव शहरात 14537 निवासी, 2617 बिगर निवासी, मिश्र व मोकळय़ा 326 जागा असून, निवासीधारकाकडे 2 कोटी 27 लाख थकबाकी असून, चालू मागणी 3 कोटी 5 लाख 59 हजार रुपये आहे. त्यापैकी 63 लाख 6 हजार रुपयांची थकबाकी, 1 कोटी 97 लाख 42 हजार चालू अशी एकूण 2 कोटी 60 लाख 48 हजार रुपये वसुली झाली आहे.

शहरातील 2 हजार 617 बिगर निवासीधारकांकडे 84 लाख 5 हजार थकबाकी, 66 लाख 69 हजार चालू मागणी असून, त्यापैकी 12 लाख 56 हजार थकीत, तर 51 लाख 99 हजार चालू अशी मिळून 64 लाख 55 हजार रुपये वसुली झाली आहे. मिश्र व मोकळ्या 326 जागा असून त्यांच्याकडे 1 कोटी 3 लाख 98 हजार रुपये थकबाकी आहे. त्यात चालू मागणी 1 कोटी 43 लाख 40 हजार असून, त्यापैकी 27 लाख 56 हजार थकीत बाकी व 1 कोटी 7 लाख 21 हजार चालू बाकी वसुली झाली आहे.

नळधारकांकडे 8 कोटींची थकबाकी

शहरात 14 हजार 699 निवासी नळधारक असून, त्यांच्याकडे 4 कोटी 15 लाख 4 हजार थकबाकी, तर 5 कोटी 15 लाख 68 हजार चालू मागणी आहे. त्यापैकी 1 कोटी 3 लाख 18 हजार थकबाकी, 3 कोटी 56 लाख 62 हजार रुपये चालू बाकी वसुली झाली आहे. 137 बिगर निवासी नळधारक आहेत.

विस्तारीकरणामुळे उत्पन्नात होणार वाढ

कोपरगाव शहराच्या आजूबाजूला असंख्य उपनगरे झालेली आहेत. त्यात मोठय़ा प्रमाणात निवासीधारक रहिवास करतात. अजूनही मुर्शतपूर, कोकमठाण गावाच्या बाजूला व नगर-मनमाड रस्त्याला शहरीकरणाची उपनगरे वेगाने वाढत आहेत. त्यातच ग्रामीण त्रिशंकू भागाचा शहर हद्दीत समावेश झालेला आहे. तेथील रहिवासीयांनी मूलभूत सुविधांची पालिकेकडे मागणी केली आहे. त्रिशंकू भागामुळे पालिकेचे उत्पन्न वाढणार आहे. नागरिकांनी पालिकेची थकीत करबाकी भरून सहकार्य करावे, असे सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.