जिवाचे बरेवाईट झाल्यास प्रसाद लाड जबाबदार! कामगारांची पोलीस ठाण्यात धाव

अंधेरीच्या इंडिगो एअरलाइन्स कंपनीमध्ये कामगार पुरवण्याचे कंत्राट रद्द झाल्यापासून ‘क्रिस्टल’ कंपनीचे मालक असलेले भाजप आमदार प्रसाद लाड बिथरले आहेत. नव्या ‘एजाईल’ कंपनीच्या कामगारांनी आपल्या कंपनीकडे यावे यासाठी व्यवस्थापन आणि पोलिसांना हाताशी धरून शेकडो कर्मचाऱ्यांचा अमानुष छळ चालवला गेला आहे. यामध्ये कामगारांवर खोटय़ा केसेस दाखल करणे, एअरपोर्ट इंट्री पास रखडवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, प्रत्येक स्तरावर अपमानास्पद वागणूक देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सांताक्रुझ विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ‘क्रिस्टलच्या त्रासाला कंटाळून कामगारांनी जिवाचे बरेवाईट केल्यास प्रसाद लाड, अमित पवार जबाबदार राहतील,’ असा इशारा दिला आहे.

इंडिगो एअरलाइन्स कंपनीमध्ये 2018 पर्यंत प्रसाद लाड यांच्या ‘क्रिस्टल’ कंपनीकडून ड्रायव्हर, लोडर कामगार पुरवले जात होते. मात्र 2018 मध्ये इंडिगोकडून ‘क्रिस्टल’चे कंत्राट रद्द करून स्वतःची कंपनी ‘एजाईल’ला हे काम देण्यात आले. याचा राग मनात धरून ‘क्रिस्टल’चे मालक प्रसाद लाड आणि डायरेक्टर अमित पवार यांनी कर्मचाऱ्यांवर व्यवस्थापन, पोलीस आणि सरकारचा दबाव आणून छळ सुरू केला. कामगार, लोडर आणि ड्रायव्हर यासह सुमारे दोन हजारांवर कामगारांना याचा नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. या त्रासाला कंटाळून कामगारांनी जिवाचे बरेवाईट केल्यास क्रिस्टलचे मालक प्रसाद लाड यांच्यासह डायरेक्टर अमित पवार, अनुसुल मोहोद, ज्ञानेश्वर शिंदे जबाबदार राहतील, असा इशारा देऊन कामगारांच्या वतीने पोलीस आयुक्तांसह पोलीस यंत्रणेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

क्रिस्टलच्या छळवणुकीने कामगाराची आत्महत्या
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून क्रिस्टलचे डायरेक्टर अमित पवार यांच्याकडून कामगारांना शिवीगाळ करणे, मानसिक त्रास देणे, पोलीस केस दाखल करणे, जेवणावरून उठवून काम करण्यास लावणे असा त्रास दिला जात आहे. या त्रासाला कंटाळून कामगार विजय वाघचौरे यांनी 19 मे रोजी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने केली आहे, मात्र याबाबत दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

शिवसेनेची संघटना असल्याने पोटशूळ
इंडिगो एअरलाइन्स कंपनीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणीत भारतीय कामगार सेनेचे युनिट कार्यरत असून गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला जात आहे. त्यामुळेच ‘क्रिस्टल’कडून कामगारांना त्रास दिला जात असल्याचे येथील भारतीय कामगार सेनेचे चिटणीस योगेश आवळे यांनी सांगितले. ‘एईपी’ पास (एअरपोर्ट इंट्री पास) मिळत नसताना भारतीय कामगार सेनेच्या आंदोलनामुळे पास मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. शिवाय कामगारांचे अनेक प्रश्न भारतीय कामगार सेनाच सोडवत असल्याचे ते म्हणाले.

क्रिस्टलची मध्यस्थी नको!
विशेष म्हणजे क्रिस्टलचे कंत्राट रद्द होऊनदेखील व्यवस्थापनाने क्रिस्टलच्या माध्यमातूनच कामगारांशी संवाद साधावा यासाठी दबाव आणला जात होता. याबाबत भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी इंडिगो व्यवस्थापनाला पत्र देऊन भारतीय कामगार सेना व इंडिगो व्यवस्थापनात अमित पवार-क्रिस्टलची मध्यस्थी नको असल्याचे सांगत भारतीय कामगार सेनेच्या कामगारांशी व्यवस्थापनाने थेट संपर्क करण्यास सांगितले आहे.

कामगारांवर अन्याय
इंडिगो कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाची छळवणूक, कामाच्या ठिकाणच्या गैरसोयी आणि एका कामगाराच्या हत्येचा निषेधार्थ मे महिन्यात आंदोलन केल्यानंतर कामगारांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. भारतीय कामगार सेनेच्या मध्यस्थीनंतर हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले, मात्र त्यानंतरही छळवणूक सुरूच आहे. कामगार चंदन कांदू यांच्यावर अन्यायकारकपणे कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे.

गुन्हा नोंदवण्यात अफरातफर
कामगारांविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात 29 सप्टेंबर 2023 रोजी खोटा गुन्हा नोंदवण्यात आल्याचे स्पष्ट झाले असताना एनसीमध्ये मात्र 17/9 रोजी गुन्हा नोंदवल्याचे समोर आल्याने गुन्हा नोंदवण्यातही अफरातफर असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.