LIC एजंट ते 23 हजार कोटींचे मालक, हिंदुस्थानातील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीशाचा प्रेरणादायी प्रवास

फोर्ब्सने 2024मधील 2781 अब्जाधीशांची यादी प्रसिद्ध केली असून यात जवळपास 200 हिंदुस्थानींची वर्णी लागली आहे. गेल्यावर्षी या यादीमध्ये 169 हिंदुस्थानी होते, मात्र यंदा यात 31 ने वाढ झाली आहे. या यादीमध्ये हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी नवव्या क्रमांकवर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 116 अब्ज डॉलर आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये लक्ष्मी मित्तल यांचाही समावेश असून ते हिंदुस्थानातील सर्वात वयस्कर अब्जाधीश ठरले आहेत.

आर्सेलर मित्तरचे चेअरमन लक्ष्मण दास मित्तल (वय – 92) यांच्याकडे 16.4 अब्ज डॉलरची (जवळपास 23 हजार कोटी) संपत्ती आहे. ते हिंदुस्थानातील दहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. एलआयसी एजंट म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मण दास मित्तल यांचा अब्जाधीशापर्यंतचा प्रवासही रंजक आहे.

पंजाबच्या होशियापूर येथे 1931मध्ये जन् झालेल्या Lachhman Das Mittal यांनी सरकारी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतल्यानंतर उर्दू आणि इंग्रजीमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. एमए इंग्रजीमध्ये त्यांनी गोल्ड मेडलही मिळवले. त्यानंतर 1955 ला त्यांनी एलआयसी एजंट म्हणून काम सुरू केले. प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीप्रमाणे मित्तल यांनीही पगारातील काही रक्कम शिल्लक टाकण्यास सुरुवात केली. पुढे याच साचलेल्या पैशांचा वापर त्यांनी शेतीशी निगडीत अवजारे बनवण्याचा व्यावसाय सुरू केला, मात्र यात त्यांना अपयश आले आणि ते दिवाळखोर झाले.

अपयशाने खचतील ते मित्तल कसले. त्यांनी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात केली आणि 60व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर नशीब आजमावण्याचे ठरवले. 1996मध्ये त्यांनी सोनालिका ट्रॅक्टर लॉन्च केला. त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. आज सोनालिका ग्रुपचा पाच देशांमध्ये प्लांट असून जवळपास 120 देशांमध्ये ट्रॅक्टरची निर्यात करतो.

अर्थात लक्ष्मण दास मित्तल सध्या कंपनीमध्ये सक्रिय नसून त्यांचे कुटुंबीय हा व्यवसाय पाहतात. त्यांचा मोठा मुलगा अमृता सागर कंपनीचा उपाध्यक्ष, तर लहाना मुलगा दीपक मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्यांचे नातू सुशांत आणि रमन हे देखील कंपनीत सक्रिया आहेत. मात्र लक्ष्मण दास मित्तल यांनी मिळवलेल्या यशामुळे आज त्यांना ‘द ट्रॅक्टर टायटन’ या नावानेही ओळखले जाते. त्यांना ‘उद्योग रत्न’सह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कराने सन्मानित करण्यात आले आहे.