मराठा समाजाच्या संतापाचा भडका; आंदोलनाचे लोण राज्यभर; निपाणीत सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा, फडणवीसांना बांगड्यांचा आहेर

जालन्यातील लाठीहल्ल्यावरून राज्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. मुंबईसह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर या ठिकाणी सकल मराठा समाजाकडून आज उग्र आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी निदर्शने, रास्ता रोको करण्यात आला. सोलापूर जिह्यात अनेक ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर उतरत टायर जाळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पोस्टर्सना जोडे मारण्यात आले. यावेळी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

सातारा जिह्यातही असंतोषाचा भडका उडाला. सातारा शहरासह जिह्यात विविध ठिकाणी तीव्र आंदोलने करण्यात आली. सातारा येथील पोवई नाक्यावर सकाळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विवेकानंद बाबर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाली. कराडमध्ये मराठा मोर्चाचे संघटक अनिल घराळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. पाटण येथील लायब्ररी चौकात मराठा क्रांती मोर्चाचे पाटण तालुका संघटक यशवंत जगताप यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. फलटणमधील डेक्कन चौकात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली सावंत यांच्या नेतृत्वाखाली काळय़ा फिती बांधून सरकारचा निषेध करण्यात आला. कोल्हापुरातही सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू होते. ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली होती. राधानगरीत काँग्रेसची निषेध सभा झाली तर हुपरी मराठा क्रांती मोर्चाने निषेध आंदोलन केले.

सोलापूर जिह्यात आज ठिकठिकाणी आंदोलन झाले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. संभाजी ब्रिगेडने पुणे महामार्ग रोखून धरला, तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषींवर कारवाई न झाल्यास ‘सोलापूर बंद’चा इशारा देण्यात आला.

माढय़ात कडकडीत बंद

माढय़ात कडकडीत बंद पाळण्यात आला. माढय़ातील मुख्य चौकामध्ये मराठा समाजाच्या वतीने टायर पेटवून सरकारविरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार बबन शिंदे, शंभुराजे साठे उपस्थित होते.

नगरमध्ये शिवसेनेची निदर्शने

नगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ासमोर निदर्शने केली. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. संभाजी ब्रिगेड सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देणार आहे, तर मराठा महासंघाने जिह्यातील अकोले, कर्जत व जामखेड येथे आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

हिंगोलीत जमावाने सरकारी गोदाम पेटवले

हिंगोली जिह्यात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. सेनगाव येथे धान्याचे शासकीय गोदाम जमावाने पेटवून दिले. तसेच तहसील कार्यालयाच्या आवारातील अनेक वाहनेही जाळण्यात आली. हिंगोली जिह्यात आज ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आले. तर सेनगाव येथे दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. आखाडा बाळापूर, दिग्रस आणि कऱहाळे येथेही रास्ता रोको झाला. उद्या सोमवारी मराठा समाजाने हिंगोली जिह्यात बंदची हाक दिली आहे.

स्वतःची दुचाकी पेटवली

या घटनेच्या निषेधार्थ जवळा बाजार येथील औंढा-परभणी रोडवर एका तरुणाने स्वतःची दुचाकी जाळून मिंधे सरकारचा निषेध व्यक्त केला. आज आठवडी बाजारात नहाद येथील किनायक रुस्तम बोरगड या तरुणाने भरचौकात आपली दुचाकी पेटवून देत मिंधे सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी जमलेल्या मराठा समाजबांधवांनी ‘मिंधे सरकारचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय’ अशा घोषणा देत तीक्र निषेध व्यक्त केला.

नाशिकसह जिह्यात कडकडीत बंद

लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी नाशिक शहरासह जिह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने तणावपूर्ण शांततेत बंद पार पडला. ठिकठिकाणी निदर्शने करून, फेरी काढून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. आरक्षणाचा निर्णय त्वरित न घेतल्यास सरकारविरुद्ध तीक्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

फडणवीसांना बांगडय़ांचा आहेर

सकल मराठा समाज मुंबईच्या वतीने प्लाझा सिनेमा येथे आज सकाळी निषेध आंदोलन करण्यात आले. काळय़ा फिती बांधून आंदोलकांनी सरकारचा निषेध केला. राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणा देण्यात आल्या. ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा बुलंद करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली. महिला आंदोलकांनी यावेळी बांगडय़ांचा आहेर फडणवीस यांना भेट दिला. मराठा समाजातील अनेक नेते सत्ताधारी पक्षांचे प्रवक्ते झालेत, असे सांगत आंदोलकांनी यावेळी जालन्यातील घटनेप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली.

महाविकास आघाडी मराठा आंदोलकांच्या पाठीशी

जालन्यातील घटनेचा निषेध करत महाविकास आघाडी ठामपणे मराठा आंदोलकांच्या पाठीशी उभी राहिली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. तिन्ही पक्षांकडून राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली जात असून देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली आहे.

निपाणीत सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

निपाणी जकळका येथे सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली, तिरडी बांधण्यात आली व समोर मडके धरून ही प्रतीकात्मक अंत्ययात्रा थेट स्मशानात नेण्यात आली.

अप्पर पोलीस महासंचालक करणार सखोल चौकशी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची अप्पर पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. आवश्यकता भासल्यास न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

या घटनेनंतर  जालनाच्या जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून त्यांचा पदभार आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांचीही जिह्याबाहेर बदली करण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मराठा समाज हा अत्यंत संवेदनशील, पण तितकाच संयमी समाज आहे. यापूर्वी लाखालाखांचे मोर्चे काढताना या समाजाने कधीही आपला संयम ढळू दिला नव्हता. त्यामुळे त्यांनी पुढेही संयम बाळगावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

गोदावरीत जलसमाधी आंदोलन

आज  गेकराई तालुक्यातील गोदाकाठी गुळज पंचायत समिती गणातील दोन ठिकाणी मिंधे सरकारकिरोधात संतप्त मराठय़ांनी टोकाचे आंदोलन केले. गुळज पंचायत समिती गणाअंतर्गत येणाऱ्या गुळज पाथरकाला, गुंठेगाक, बोरगाक, सुरडेगाक, मालेगाक (खु.), मालेगाक (बु.), राक्षसभुकन, पांचाळेश्वर, उमापूर, टाकळी, उंचेगाक, हिरडापुरी, सास्ते पिंपळगाक येथील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते गोदाकाठाकर आले आणि त्यांनी थेट गोदाकरीपात्रात उडय़ा घेत जलसमाधी आंदोलन केले.

बीडमध्ये चार बस जाळल्या, 45 एसटी डेपो बंद

मराठा समाजाला आरक्षण मिळाके यासाठी रात्री संतप्त आंदोलकांनी बीड जिह्यात चार ठिकाणी बसकर दगडफेक करून त्या बसेस जाळल्या. एसटी महामंडळाच्या एकूण 250 आगारांपैकी 45 आगार रविवारीही पूर्णतः बंद होते. गेल्या दोन दिवसांपासून या आगारांतून एकही एसटी सोडली गेली नाही. जालना जिह्यातील आंदोलनाची झळ बीड, जालना, परभणी, धाराशिव, नगर या जिह्यांना बसली.

भिवंडी, कसारा, किन्हवली, खर्डी, जव्हारमध्ये आंदोलन

ठाणे जिह्यातील भिवंडी, कसारा, किन्हवली, खर्डी तसेच पालघर जिह्याच्या जव्हारमध्ये आज मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जव्हारच्या गांधी चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख परेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली  आंदोलन करण्यात आले. नवी मुंबईतदेखील लाठीमाराविरोधात मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने आंदोलन केले.

आंदोलक तरुणाच्या डोक्यात छर्रा घुसला

आंतरकाली सराटी येथील लाठीहल्ला आणि गोळीबाराच्या घटनेमध्ये 22 कर्षीय सिद्धेश्वर तारख या तरुणाच्या डोक्यातून आज छर्रा निघाल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्यावर आज अंबड रुग्णालयात शस्त्र्ाक्रिया करून डोक्यातील छर्रा काढण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेला सिद्धेश्वर तारख यास शनिवारी अंबड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून नंतर जालना रुग्णालयात हलकिण्यात आले. शनिकारी सकाळी त्याला पुन्हा अंबड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. याकेळी त्याने डोक्यात केदना होत असल्याचे सांगितल्याने डॉक्टरांनी एक्स रे काढला असता डोक्यात छर्रा असल्याचे निदर्शनास आले.