गोयल यांना नाकाला रुमाल लावणे पडले महागात

उच्चभ्रू मलबार हिलमधून बोरिवलीत घर घेऊन शिफ्ट झालेले उत्तर मुंबईतील आयात उमेदवार पियूष गोयल यांनी मच्छीमार्केटमधून फिरताना नाकाला रुमाल लावल्यामुळे त्यांच्याविरोधात स्थानिक मच्छीमारांचा विरोध वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर झाल्या प्रकाराचा एक अहवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे पाठवणार आहेत. आधीच बाहेरचा उमेदवार म्हणून नाराज असलेल्या भाजप कार्यकर्ते आणि स्थानिकांमध्ये रुमाल प्रकरणामुळे अधिक भर पडली आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पियूष गोयल वझिरा मच्छी मार्पेटजवळील गावठाणात प्रचार करत असताना नाकाला रुमाल लावून फिरत होते. त्यामुळे स्थानिक मच्छीमार भाजपविरोधात आक्रमक झाले तर काँग्रेसने रविवारी कांदिवली येथील पियूष गोयल यांच्या कार्यालयावर मच्छीमारांसह मोर्चा काढून गोयल यांनी भूमिपुत्रांच्या केलेल्या अपमानाचा निषेध केला. त्यामुळे मतदानाआधीच डॅमेज झालेली भाजपची प्रतिमा सुधारण्यासाठी भाजपने त्वरित हालचाली सुरू केल्या असून भाजपचे पेंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे कांदिवली येथील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.

उत्तर मुंबईत भाजपमध्ये विसंवाद

उत्तर मुंबईत मराठी आणि गुजराती टक्का मोठय़ा प्रमाणात आहे, मात्र भाजपने आपल्यालाच मतदान होईल, अशी मानसिकता बनवली असून त्यामुळे प्रचार, सभांवेळी चुका होत आहेत. भाजप अजूनही कार्यकर्त्यांना प्रचार करताना येणाऱया अडचणी, त्याला कार्यकर्त्यांनी कसे सामोरे जायचे यावर चर्चा करत चाचपणी करत आहे.

तावडे विरुद्ध गोयल

मुंबईत बोरिवली पश्चिम मतदारसंघातून विनोद तावडे हे 2014 ते 2019 या काळात आमदार होते, त्यांचा प्रभाव या मतदारसंघात फारसा नसल्याने त्यांना 2019 मध्ये उमेदवारी दिली गेली नाही अशी चर्चा आहे. महत्त्वाचे म्हणजे उमेदवार पियूष गोयल आणि विनोद तावडे यांच्यात फारसे सख्य नसल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे भाजपचे हे दोन्ही नेते उत्तर मुंबई सांभाळणार की असलेल्या गोंधळात भर घालणार, अशी भीतीही भाजप कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.