शहापुरात कमळ कोमेजणार, 14 पैकी 10 जिल्हा परिषद गटात भाजपची पाटी कोरी

आगामी लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार असून महाविकास आघाडीसमोर महायुतीची ताकद नगण्य आहे. जिल्हा परिषदेच्या 14 पैकी 10 गटांत भाजपची पाटी कोरी असल्याने कमळ कोमेजणार आहे. तालुक्यात शिवसेना महाविकास आघाडीचा जनाधार मोठा झाल्याने भाजपचे उमदेवार कपिल पाटील यांची धाकधुक वाढली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांनी आकाशपाताळ एक करूनही त्यांना शहापूरमध्ये एकही जागा निवडून आणता आली नाही. त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मिंधे व भाजपने पैशांचा बाजार मांडूनही काही ठराविक ग्रामपंचायती वगळता त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रात व राज्यात सत्ता असताना तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे प्रशासन ताब्यात असताना तालुक्याचा विकास कोसो दूर मागे राहिला. जनतेच्या जिव्हाळ्याचे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे प्रचारात भाजपवाल्यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

महायुती कमजोर

जिल्हा परिषदेच्या 14 गटांपैकी मोखावणे, शिरोळ, बिरवाडी, आवाळे, चेरपोली, साकडबाव, गुंडे, आसनगाव, मळेगाव व वासिंद अशा दहा गटांत भाजपला कार्यकर्त्यांची जमवाजमव करावी लागत आहे. या दहा गटांतील बहुतांशी ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडे आहेत. त्यामुळे या गटात कपिल पाटील पिछाडीवर राहणार आहेत. किन्हवली, सोगाव, गोठेघर व नडगाव गटात कार्यकर्ते आयात करूनही महायुती आघाडीसमोर कमजोर ठरली आहे. त्यात जिल्हा परिषदेचे दहा माजी सदस्य आघाडीकडे असल्याने प्रचाराची मोठी फळी आघाडीकडे आहे. त्यामुळे शहापूरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे हे जोरदार आघाडी घेणार आहेत.