Lok Sabha Election 2024 : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या एकीची वज्रमूठ

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱयांची बैठक आज गोरेगावमधील पश्चिमेतील ओझोन सुप्रीम बँक्वेट हॉलमध्ये झाली. यावेळी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना विजयी करण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व पक्षांतील ज्येष्ठ पदाधिकाऱयांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या तावडीतून लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी देशभरात शिवसेनेसह लोकशाही मानणारे पक्ष एकत्र आले आहेत. यातून देशात इंडिया आघाडी तर राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया आणि महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, आप, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष व अन्य पक्ष पूर्ण ताकदीशी उतरले आहेत. उत्तर पश्चिम मतदारसंघासह मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघांत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी इंडिया आघाडीतील सर्व नेते व कार्यकर्ते यापुढे एकदिलाने काम करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर, मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्यातून रणनीती ठरवण्यासाठी आज गोरेगावात इंडिया-महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची बैठक झाली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱयांना शिवसेना नेते सुभाष देसाई, अॅड. अनिल परब, विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू, लोकसभा समन्वयक आमदार विलास पोतनीस, आमदार ऋतुजा लटके, शिवसेना उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी, राजूल पटेल, शीतल शेठ-देवरुखकर, काँग्रेस आमदार अस्लम शेख, काँग्रेसचे माजी आमदार सुरेश शेट्टी, अशोक जाधव, बलदेव खोसा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष क्लाईव्ह डायस, मोहसीन हैदर, राजेश शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजित रावराणे, अल्पना पेंटर, सीपीएमचे प्रदीप साळवी, आपचे रुबेन मस्कर्हेन्स, संघटक साधना माने यांच्यासह मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.