Lok Sabha Election 2024 : कनौजमध्ये ‘सपा’ने अखेरच्या क्षणी बदलला उमेदवार; अखिलेश यादव स्वत: रिंगणात

उत्तर प्रदेशमधील कनौज लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळत आहे. समाजवादी पार्टीने येथून आधी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र आणि अखिलेश यादव यांचा भाचा तेज प्रताप यादव यांना तिकीट दिले होते. मात्र अखेरच्या क्षणी ‘सपा’ने तेज प्रताप यादव यांचे तिकीट कापले असून आता येथून स्वत: अखिलेश यादव लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. गुरुवारी दुपारी 12 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती ‘सपा’ने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून दिली आहे.

समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री Akhilesh Yadav लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. अखिलेश हे कनौज लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उभे राहतील असे म्हटले जात होते, परंतु समाजवादी पार्टीने या सर्व चर्चांना पूर्णविराम देत कनौज येथून तेज प्रताप यादव यांना उमेदवारी दिली होती. मात्र ‘सपा’च्या स्थानिक नेत्यांनी याला विरोध केला होता. स्थानिक नेत्यांची नाराजी निवडणुकीत भारी पडण्याची शक्यता असल्याने तेज प्रताप यादव यांचे तिकीट कापत स्वत: अखिलेश यादव यांनी कनौजमधून लढण्याचा निर्णय घेतला.

बालेकिल्ल्यात भाजपने लावलेला सुरुंग

कनौज लोकसभा मतदारसंघ हा समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला राहिला आहे. 1998 पासून 2014 पर्यंत सलग समाजवादी पार्टीनेच या जागेवर बाजी मारली आहे, परंतु 2019 च्या निवडणुकीत भाजपचे सुब्रत पाठक यांनी कनौज येथून अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांचा पराभव करून ही जागा खेचून आणली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीची युती होती. या निवडणुकीत डिंपल यादव यांना 5 लाख 50 हजार 734 मते मिळाली होती, तर सुब्रत पाठक यांना 5लाख 63 हजार 87 मते मिळाली होती.

काय आहे गणित?

दरम्यान, गेल्या 5 वर्षामध्ये कनौजमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे. लोकसभा निवडणुकीसह भाजपने या मतदारसंघात येणाऱ्या 5 पैकी 4 विधानसभेच्या जागांवर झेंडा फडकवला आहे. कनौजमध्ये जवळपास 16 टक्के मुस्लिम, 16 टक्के यादव, 15 टक्के ब्राह्मण, आणि 10 टक्के राजपूत मतदार असून अन्य 39 टक्के आहेत. यात दलितांची संख्या जास्त असून अखिलेश यादव स्वत: रिंगणात उतरल्याने ‘सपा’च्या कार्यकर्त्यांमध्ये तरतरी असून ते अधिक जोमाने तयारीला लागले आहेत. मात्र अखिलेश यांच्यासाठी ही लढाई सोपी असणार नाही अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.