मोदींना सहा वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घाला! संयुक्त किसान मोर्चाची सुप्रीम कोर्टाकडे मागणी

काँग्रेस सत्तेवर आल्यास लोकांची सर्व साधनसंपत्ती मुसलमानांकडे वळवली जाईल, अशा आशयाचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान येथील प्रचारसभेत केले. त्यांनी हे विखारी विधान जातीय हिंसाचार आणि रक्तपात घडवण्याच्या हेतूनेच केले असून सर्वोच्च न्यायालयाने या भाषणाची स्वतःहून दखल घ्यावी आणि त्यांना पुढची सहा वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी घालावी आणि त्यांच्यावर खटला चालवावा, अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. मोदींना अशी विधाने करून जातीय रक्तपात घडवून आणायचाय, असा आरोपही करण्यात आला असून मोदींविरोधात देशभरातील शेतकरी वर्ग आक्रमक झाला आहे.

मोदी हे एका विशिष्ट समुदायाला, धर्माच्या लोकांना पेंद्रस्थानी ठेवून विखारी भाषणे ठोकत असल्याचा आरोपही संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. त्यांच्या अशा प्रकारच्या विद्वेषी आणि अत्यंत विखारी अशा भाषणांमुळे देशातील शांतता धोक्यात येऊ शकते, असा इशाराही संयुक्त किसान मोर्चाने दिला आहे.

लोकांचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठीच खटाटोप

गेल्या दहा वर्षांत देशात गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढली असून त्यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच मोदींचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. ब्रिटनमधील ‘ऑक्सफॅम’ या संस्थेच्या अहवालानुसार देशातील एक टक्के जनता अब्जाधीशांचे प्रतिनिधित्व करते. देशातील 40.5 टक्के संपत्तीचे ते मालक आहेत. त्यानंतर 70 कोटी म्हणजेच 50 टक्के जनता ही अत्यंत गरीब आणि शेतकरी आणि मजुरांचे प्रतिनिधित्व करते. त्यांच्याकडे देशाच्या केवळ 3 टक्के संपत्ती आहे. या ठिकाणी गरीब या वर्गात हिंदू किंवा मुस्लिम असे वर्गीकरण होऊच शकत नाही, याकडे संयुक्त किसान मोर्चाने लक्ष वेधले आहे.

मोदी सरकार कॉर्पोरटधार्जिणे

मोदी सरकार हे कॉर्पोरेटधार्जिणे असल्याचेच अनेकदा उघड झाले आहे. दहा वर्षांत मोदी सरकारने कॉर्पोरेट कर 30 टक्क्यांवरून 22 आणि 16 टक्क्यांपर्यंत खाली आणला. बडय़ा पंपन्यांचे तब्बल 14.55 लाख कोटींचे कर्ज माफ केले, मात्र शेतकऱयांचे एका पैशांचेही कर्ज माफ केले नाही. देशात दिवसाला 154 शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करत असताना मोदींनी सातत्याने त्यांच्याप्रति असंवेदनशीलताच दाखवली, अशा शब्दांत संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारवर तोफ डागली आहे. जनतेने राष्ट्रीय एकता आणि बंधुभाव ठेवावा तरच जातीय विभागणी करणाऱया राजकारणावर मात करता येईल, असे आवाहनही संयुक्त किसान मोर्चाने केले आहे.

पंतप्रधानपदावरून हकालपट्टी करा

नरेंद्र मोदी यांची तत्काळ पंतप्रधानपदावरून हकालपट्टी करायला हवी. अन्यथा देशाला अत्यंत भयंकर स्थितीचा आणि घटनेच्या ऱहासाचा सामना करावा लागेल, असा इशारा संयुक्त किसान मोर्चाने दिला आहे. मोदींनी विखारी भाषण करून देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर घाला घातला आहे. देशातील एका अल्पसंख्याक गटाला घुसखोर असे संबोधून त्यांनी घटनेच्या धर्मनिरपेक्षता कायद्याचे उल्लंघन केले आहे. धर्मनिरपेक्षता हा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या 77 वर्षांत लोकशाहीच्या यशस्वी होण्यामागचा यशस्वी फॉर्म्युला आहे. त्याच्यावरच मोदींनी घाव घातल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.