माझ्या आईने देशासाठी मंगळसूत्राचे बलिदान दिले! प्रियांका गांधी यांचा मोदींवर हल्ला

एक काळ असा होता की, जेव्हा एखादा नेता उभा राहिला की, देशातील जनतेला त्याच्याकडून नैतिकतेची अपेक्षा असायची, पण आज देशाच्या सर्वात मोठय़ा नेत्याने नैतिकता सोडली आहे.

काँग्रेसला तुमचे मंगळसूत्र हिसकावून घ्यायचे आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी चांगलाच समाचार घेतला. देशात जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा आजी इंदिरा गांधींनी त्यांचे सोने दान केले होते. माझी आई सोनिया गांधी यांनी देशासाठी आपल्या मंगळसूत्राचे बलिदान दिले आहे. मोदींना ‘मंगळसूत्र’चे महत्त्व कळले असते तर त्यांनी अशा अनैतिक गोष्टी बोलल्या नसत्या, असे सांगत प्रियांका यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंगळुरूमध्ये एका रॅलीला संबोधित करताना प्रियांका गांधी यांनी लॉकडाऊन, मणिपूर हिंसाचार, शेतकरी आंदोलन अशा अनेक मुद्दय़ांवर प्रश्न उपस्थित करत मोदींवर हल्ला चढवला. नोटाबंदी झाली तेव्हा त्यांनी महिलांची बचत हिरावून घेतली. लॉकडाऊन लागू केला आणि देशभरातून मजूर उत्तर प्रदेश, बिहार आणि राज्यात आले. वेगवेगळय़ा ठिकाणी ते पायी निघाले. जेव्हा ट्रेन आणि बसेस थांबल्या होत्या, तेव्हा महिलांनी त्यांचे दागिने गहाण ठेवावे लागले हे दिसले नाही का? तेव्हा मोदी कुठे होते? असा सवाल प्रियांका यांनी केला.

मतांसाठी महिलांना घाबरवता, लाज वाटली पाहिजे

n देश स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली. 55 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. तुमचे सोने कोणी हिसकावले, तुमचे मंगळसूत्र हिसकावले का? असा सवाल करत प्रियांका गांधी म्हणाल्या, महिलांनी मतदान करावे यासाठी त्यांना नको त्या गोष्टी सांगून घाबरवले जात आहे, अशा गोष्टी करायला त्यांना लाज वाटायला पाहिजे.
n जेव्हा शेतकरी कर्जबाजारी होतो तेव्हा त्याची पत्नी तिचे मंगळसूत्र गहाण ठेवते. जेव्हा त्यांच्या मुलांची लग्ने होतात किंवा त्यांना औषधाची गरज असते तेव्हा स्त्रिया त्यांचे दागिने गहाण ठेवतात. हे या लोकांना कळत नाही, असा टोला प्रियांका गांधी यांनी लगावला.
n आंदोलनात 600 शेतकऱयांनी जीव गमावला, मोदींनी त्या विधवांच्या मंगळसूत्राचा विचार केला का?
n मणिपूरमध्ये जेव्हा एका सैनिकाच्या पत्नीची नग्न परेड करण्यात आली तेव्हा मोदी गप्प होते, काहीही बोलले नाहीत.

काय म्हणाले होते पीएम मोदी?

राजस्थानमध्ये एका सभेत मोदी म्हणाले होते की, ‘काँग्रेसने लोकांच्या कष्टाने कमावलेला पैसा आणि मौल्यवान वस्तू घुसखोरांना व ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना देण्याची योजना आखली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास माता-भगिनींचे सोने, मंगळसूत्र हिसकावून घेतील,’ असे म्हणाले होते.