महायुतीत सहा जागांचा घोळ कायम; ठाणे, नाशिकवरून खेचाखेची

लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीत सहा जागांचा घोळ सुरूच आहे. दक्षिण मुंबई, ठाणे, पालघरच्या जागेवर शिंदे गट आणि भाजपने दावा केला आहे. नाशिक लोकसभेच्या जागेसाठी तिन्ही पक्ष अडून बसल्याने तिढा निर्माण झाला आहे. तर उत्तर-पश्चिम मुंबईत शिंदे गटाकडून चर्चेत असलेल्या नावांना मनसे तसेच भाजपचा विरोध आहे. उत्तर-मध्य मुंबईत भाजपकडून उमेदवारांची शोधाशोध सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली तरी महायुतीकडून सहा जागांवरील उमेदवार कोण हे अद्याप निश्चित झालेले नाही. दक्षिण मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक या चार ठिकाणी जागा कुणी लढवायची यावरून एकमत झालेले नाही. तर उत्तर-पश्चिम मुंबई व उत्तर मध्य मुंबईत उमेदवार कोण, याचा निर्णय झालेला नाही.

दक्षिण मुंबई – या मतदारसंघात भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांची नावे चर्चेत आहेत. या दोघांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. पण ही जागा शिंदे गट सोडायला तयार नाही. त्यांच्याकडून आमदार यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. पण भाजप त्यांच्या नावास फारसा अनुकूल नाही.

उत्तर पश्चिम मुंबई – या मतदारसंघात शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. कॉँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले संजय निरुपम येथून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र या दोन्ही नावांना मनसेने आक्षेप घेतला आहे. भाजपचाही वायकर यांच्या उमेदवारीस पाठिंबा नसल्याची चर्चा आहे.

उत्तर मध्य मुंबई – या मतदारसंघातून विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी जिंकून येणाऱ्या उमेदवाराचा शोध भाजपकडून सुरू आहे.  आमदार आशीष शेलार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी नकार दिल्याने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा आहे. ऐन वेळी आमदार पराग अळवणी यांच्या नावाचा विचार भाजपकडून केला जाऊ शकतो.

ठाणे – या मतदारसंघावर भाजपने दावा केल्याने अजूनही या ठिकाणी उमेदवार जाहीर झालेला नाही. शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि नरेश मस्के यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांची नावे चर्चेमध्ये आहेत.

नाशिक – नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. मात्र ही जागा अजित पवार गटाला देण्यासाठी भाजपकडून आग्रह धरण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय होत नसल्याने छगन भुजबळ यांनी येथून लढणार नसल्याचे सांगितले आहे, पण जागेवरील दावा सोडलेला नाही. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या जागेवर दावा सांगितला आहे.

पालघर – या मतदारसंघात शिंदे गटाचे राजेंद्र गावीत विद्यमान खासदार आहेत. याआधी गावीत हे पोटनिवडणुकीत येथून भाजपकडून निवडून आले होते. ही जागा परत मिळावी, असा भाजपचा प्रयत्न आहे. गावीतही शिंदे गटाकडून लढण्यास फारसे उत्सुक नाहीत. ही जागा महायुतीच्या जागावाटपात कुणाकडे राहणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

अजित पवार गटाकडून नाशिकसाठी ठराव

नाशिकमध्ये अजित पवार गटानेच निवडणूक लढवावी, असा ठराव या गटाच्या बैठकीत करण्यात आला. यामुळे मिंधे व भाजपची मोठी अडचण झाली आहे.  नाशिकच्या जागेसाठी मिंधे गटाचे हेमंत गोडसे, भाजपचे दिनकर पाटील, आमदार राहुल ढिकले, केदा आहेर यांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने सावधानता म्हणून बैठक घेत नाशिकची जागा ही अजितदादा गटानेच लढवावी, शक्यतो स्वतः भुजबळ यांनीच उमेदवारी करावी, नाहीतर त्यांनीच उमेदवार ठरवावा, असा ठराव करण्यात आला. मंत्री भुजबळ यांच्या उमेदवारीला माझा विरोध नाही, पण पक्षाने आदेश दिल्यास मी लढेन, असे आमदार माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले. या बैठकीस माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवराम झोले, नाना महाले, गोरख बोडके, विष्णुपंत म्हैसधुणे, अर्जुन टिळे, सोमनाथ बोराडे हजर होते.