कुछ तो गडबड है… मतदानानंतर 10 दिवसांनी डेटा केला जारी, कारभारावर विरोधकांचे प्रश्नचिन्ह

lok sabha election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दहा दिवसांनंतर आणि दुसऱया टप्प्यातील मतदानाच्या चार दिवसांनंतर म्हणजेच 30 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाने मतदानाचा डेटा जारी केला. लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 66.14 टक्के तर दुसऱया टप्प्यात 66.7 टक्के मतदान झाले. मात्र प्रसारमाध्यमांनी दिलेल्या टक्केवारीत आणि निवडणूक आयोगाने जारी केलेल्या डेटानुसार मतदानाच्या टक्केवारीत तफावत दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या या कारभारावर विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तसेच कुछ तो गडबड है म्हणत विरोधकांनी अनेक सवाल केले आहेत.

मतदानाचा डेटा जारी करण्यासाठी इतके दहा दिवस का लागले, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी केला आहे. दुसऱया टप्प्यानंतर प्रसारमाध्यमांनी 60 टक्के मतदान झाल्याचे दाखवले; परंतु दहा दिवसांनी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अहवालानुसार हे मतदान 66 टक्के इतके झाले. हे सर्व काय सुरू आहे, असा सवाल विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. मतदानाचा डेटा इतक्या उशिरा जाहीर करणे म्हणजे निकालामध्ये छेडछाड होण्याचा संशय निर्माण करण्यासारखे आहे, असे सीपीआयएमचे नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे.

लोकशाहीचा पाया संशयाच्या भोवऱ्यात

निवडणूक प्रक्रियेची अखंडता आणि लोकशाहीचा पायाच संशयाच्या भोवऱयात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि बारामती मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगावर मोदी सरकारचा दबाव असून निवडणुकीत निष्पक्षता आणि पारदर्शकता असायला हवी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

नेमका काय गोलमाल?

19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. त्यानंतर दहा दिवस उलटूनही निवडणूक आयोग मतदानाची अधिकृत अंतिम टक्केवारी सांगण्यात सपशेल अपयशी ठरला. त्याचप्रमाणे 26 एप्रिल रोजी दुसऱया टप्प्यातील मतदानाची अधिकृत अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने जारी केली नाही.

निवडणूक आयोगाने प्रत्यक्षात अधिकृतरीत्या मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यासाठी तब्बल 11 दिवसांचा वेळ घेतल्याकडे योगेंद्र यादव यांनी लक्ष वेधले आहे.