पराभवाच्या भितीने घाबरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी वाट्टेल ते खोटे, नाटे बोलत आहेत; हुसेन दलवाई यांची मोदींवर बोचरी टीका

भाजप ही लोकसभेची निवडणूक हरणार याची आता खात्री झाल्यानंतर प्रधानमंत्री आणि त्यांचे लोक काहीही बरळायला लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष तुमच्या खिशातून पैसे काढून मुसलमानांना वाटणार आहे. तुमचे दाग- दागिने त्यांना वाटणार आहे. जे लोक घुसखोरी करीत आहेत त्यांच्यासाठी हे सगळं केले जाते. घुसखोरीविरोधात काँग्रेसने जितकी कठोर भूमिका घेतली आणि जितक्या लोकांना शिक्षा केल्या, तसं भाजपच्या काळात काहीच झालेलं नाही. सबंध हिमालयामध्ये चीन ज्या पद्धतीने घुसला आहे त्याबद्दल काहीच करायचं नाही, काहीच बोलायचं नाही आणि सतत कॉंग्रेसवर आरोप करायचे ही मोदींची कार्यपद्धती आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.

नरेंद्र मोदी दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देणार होते. त्याबद्दल ते आज काहीच बोलत नाही. गेल्या 10 वर्षात 20 कोटी रोजगार देणे तर दूरच नोटाबंदी आणि कोरोनामध्ये लावलेल्या लॉकडाऊनमुळे कोट्यावधी लोकांच्या असलेल्या नोकऱ्या गेल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असे मोदींनी आश्वासन दिले होते. त्याच्या संबंधात काहीच न करता शेतकऱ्यांना गोळ्या घालण्याचे काम मोदीजींनी केलं आहे. त्यांच्याकडे लोकांना सांगण्यासारखं काहीच नाही म्हणून हिंदू-मुसलमान वाद घडवून आणतात. गल्लीबोळातील संघाचे कार्यकर्ते जसे बोलतात तसे प्रधानमंत्री बोलत आहेत. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.

काँग्रेसमुळे दलित, आदिवासी ओबीसी समाजासाठी राखीव जागा निर्माण केल्या गेल्या. त्यासाठी घटनेमध्ये व्यवस्था केली. मागासलेपण असलेल्या समाजाला इतर समाजाप्रमाणे बरोबरीच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. सामाजिक समानता निर्माण व्हावी म्हणून ‘समान संधीसाठी ‘विशेष संधी’ हे तत्त्व स्वीकारले’. याउलट रा.स्व.संघ नेहमीच आरक्षणाला विरोध करत आला आहे. “भारतीय घटना म्हणजे वेगवेगळ्या देशाच्या घटनेतील कायदे उचलून बनवलेली ‘गोधडी’ आहे”. असे माजी संघ प्रमुख गोळवलकर सतत म्हणायचे. याची आठवण हुसेन दलवाई यांनी आपल्या पत्रकात करून दिली आहे.

आज मुसलमानांना धर्माच्या अनुषंगाने आरक्षण दिले जाणार असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मुसलमानांमध्ये सुद्धा मागासलेले लोक आहेत, दलित, आदिवासी, ओबीसी, जाती आहेत. धर्म बदलला म्हणून जात बदलत नाही हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. मुस्लिम समाजाला आरक्षण धर्माच्या अनुषंगाने नव्हे तर त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावरच द्यावे ही मागणी आहे. इतकेच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयानेही मुस्लिम समाजात सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण आहे म्हणून त्यांना शिक्षण क्षेत्रात आरक्षण द्यावे अशी शिफारस केली आहे. असे असतानाही मागासलेल्या समाजातील लोकांना इतर समाजाबरोबर आणण्याचा प्रयत्न केला तर मोदीजी, तुमच्या पोटात का दुखतं? असा सवाल दलवाई यांनी उपस्थित केला आहे. मोदीजी, आपण आर.एस.एस.चे प्रचारक नाहीयेत. तुम्ही या देशाचे ‘प्रधानमंत्री’ आहात. थोडी तरी याची तमा बाळगा. प्रधानमंत्री पदाची गरिमा तुम्ही खाली आणत आहात, ही चांगली गोष्ट नाही. अशा तीव्र शब्दात दलवाईनी आपला संताप व्यक्त केला.