Lok Sabha Election 2024 – नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा, भुजबळ-गोडसे आमने सामने

महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून तिढा वाढतच चालला आहे. या मतदारसंघात माझ्या नावाची चर्चा सुरू असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) छगन भुजबळ यांनी केले, तर  या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच मिंधे गटाचे हेमंत गोडसे यांनी गुलाल उधळत प्रचाराला सुरुवात केली आहे.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. नाशिकमधील जागेवरून वाद असल्याने या जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. पण त्यापूर्वीच मिंधे गटाचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांनी नाशिकमध्ये मिरवणूक काढत मोठे शक्तिप्रदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला प्रचार सुरू करण्यास सांगितले आहे. ही जागा आम्हालाच मिळणार, असे हेमंत गोडसे म्हणाले.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे छगन भुजबळ म्हणाले की, नवी दिल्लीत माझ्या नावाची चर्चा सुरू झाली. मी होळीच्या दिवशी मुंबईहून नाशिकला जायला निघालो, पण मला पुन्हा मुंबईला बोलावण्यात आले.  माझ्या उमेदवारीची चर्चा आहे हे खरे आहे का असा प्रश्न मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. त्यांनी हे खरे असल्याचे सांगितले. त्यामुळे तुम्हालाच उभे राहावे लागेल. महायुतीकडून मला उमेदवारी मिळाली तर मी लोकसभा लढेन, असे छगन भुजबळ म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना माध्यमांनी यासंदर्भात विचारले असता नाशिकमधील जागेबाबत वेट ऍण्ड वॉच आहे.