कपाटात गेलेली त्यांची फाईल उद्या कधीही बाहेर काढली जाईल; शरद पवार यांचा अजितदादा गटाला इशारा

मोदींच्या विचारांसोबत गेल्यानंतर ‘त्यांची’ फाईल कपाटात ठेवली जाईल. पण उद्या ती फाईल कधीही बाहेर काढली जाईल. त्यामुळे आजचे मरण उद्यावर गेलं असं वाटलं तर त्यात काही चुकीचं नाही. ‘त्यांच्या’ डोक्यावर कारवाईची तलवार नेहमी राहील अशी स्पष्ट भूमिका मांडतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजितदादा गटाला इशारा दिला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय तपास यंत्रणा, अजित पवार गट याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. वर्चस्वातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही तर एजन्सींकडून (तपास यंत्रणा) चौकशीचे जे उद्योग सुरू होते त्यामुळे अनेक सहकारी अस्वस्थ झाल्याने त्यांनी हे कृत्य केले असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

चौकशीच्या ससेमिऱयामुळे सहकारी अस्वस्थ होते

केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या ससेमिऱयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही सहकारी अस्वस्थ होते. त्यांची खंत ते माझ्यासमोर मांडत होते. हल्ली भाजपला वॉशिंग मशीन म्हटलं जातं. म्हणजे वॉशिंग मशिंगमध्ये टाकलं की स्वच्छ धुवून बाहेर निघू. तशी संधी आपल्याला मिळेल असं काही लोकांच मत होतं असं शरद पवार म्हणाले.

त्यांचे भवितव्य मोदींच्या हातात

पहाटेचा शपथविधीचा अजित पवारांचा निर्णय चुकीचा होता. दुरूस्ती करण्याची संधी द्या असे अजित पवार म्हणाले होते. त्यामुळे त्यांना संधी दिली असे शरद पवार यांनी सांगितले. अजित पवारांना जशी एक संधी दिली तशी संधी इतर नेत्यांनाही देणार का? यावर शरद पवार म्हणाले, मला वाटत नाही ते परत येतील. जोपर्यंत मोदींच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत ते परत येणार नाहीत. कारण त्यांचे सर्व भवितव्य मोदींच्या हातात आहे.

अमित शहा यांच्या अजित पवारांना सूचना

गृहमंत्री अमित शहा यांनी अजित पवारांना बारामती मतदारसंघ जिंकून आणण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मला कळली. बारामतीमध्ये अजुन मी प्रचाराला सुरूवात केलेली नाही. फक्त प्रचाराचा नारळ पह्डण्यासाठी गेलो होतो. शेवटच्या टप्प्यात मी प्रचारासाठी जाईन असे शरद पवार यांनी सांगितले.